अनिल कोकीळ यांनी भेट दिलेली बॅग आणि साहित्य ज्येष्ठ शिवसैनिकाने जाळून टाकत निषेध व्यक्त केला. गद्दाराला हाकलवून द्या, त्याला कुठेही उभा करू नका, त्याला त्याची जागा दाखवा, असे म्हणत लालबाग येथील ज्येष्ठ शिवसैनिकाने संताप व्यक्त केला.
अनिल कोकीळ यांना प्रभाग क्रमांक २०२४ मधून उद्धव ठाकरे यांनी उमेदवारी नाकारल्याने त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या सेनेत प्रवेश केला. आपल्यावर अन्याय होत असल्याचे सांगत कोकीळ यांनी धनुष्यबाण हाती घेतले. आज दुपारी त्यांनी महापालिका निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला.
advertisement
कोकीळ यांच्या नावावर फुली मारून ठाकरेंकडून किरण तावडे यांना उमेदवारी
प्रभाग क्रमांक २०४ मध्ये अनिल कोकीळ यांना डावलून उद्धव ठाकरे यांनी किरण तावडे यांना उमेदवारी दिल्याने कोकीळ नाराज झाले होते. प्रभाग क्रमांक २०४ मधून अनिल कोकीळ यांनी उमेदवारी मागितली होती. सुरुवातीच्या त्यांच्या नावाची चर्चाही झाली. परंतु ऐनवेळी कोकीळ यांच्या नावावर फुली मारून उद्धव ठाकरे यांनी किरण तावडे यांना उमेदवारी दिली.
लालबागमध्ये तावडे विरुद्ध कोकीळ यांच्यात फाईट!
अनिल कोकीळ यांनी शेवटच्या क्षणी पक्षांतर केल्याने आणि त्यांना शिंदेसेनेकडून उमेदवारीही मिळाल्याने यंदा लालबागमधील लढाई अतिशय निकराची होणार आहे. उद्धव ठाकरे यांच्या सेनेकडून किरण तावडे विरुद्ध शिंदेसेनेकडून अनिल कोकीळ यांच्यात तगडी लढत होईल. मुंबईतील ही लढत लक्षवेळी लढतींपैकी एक असेल. लालबाग हा परिसर मराठी बहुल आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याने पक्षाचे तिकीट असेल तर उमेदवार जिंकून येतोच असा येथील अनुभव आहे. परंतु पक्षात फूट पडल्यानंतर ताकद विभागली गेली आहे. पक्षाकडून माझ्यावर अन्याय झाल्याने शिंदसेनेत प्रवेश केल्याचे कोकीळ यांनी सांगितले.
