उपमुख्यमंत्री झाल्यानंतर ६ महिन्यांच्या आत सुनेत्रा पवारांना विधानसभा किंवा विधान परिषदेचं सदस्यत्व घेणं गरजेचं आहे, अशी स्थितीत त्यांना येत्या काही काळात खासदारकीचा राजीनामा द्यावा लागणार आहे. त्यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्याजागी पार्थ पवारांची वर्णी लागू शकते. मात्र राज्यसभा निवडणुकीच्या आधीच पार्थ पवारांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण त्यांचे जवळचे नातेवाईक दिग्विजय पाटील यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे.
advertisement
दिग्विजय पाटलांना पोलीस अटक करणार?
मिळालेल्या माहितीनुसार, मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणात गुन्हा दाखल असलेल्या दिग्विजय पाटीलने पुणे सत्र न्यायालयातील त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज मागे घेतला आहे. दिग्विजय पाटीलने त्याच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. मात्र या प्रकरणात पोलिसांनी दोषारोपपत्र दाखल केल्यानंतर दिग्विजय पाटीलने अटकपूर्व जामीन अर्ज मागे घेतला आहे. नवीन मुद्यांच्या आधारे पुन्हा अटकपूर्व जामीन अर्ज दाखल करण्यासाठी त्यांनी हा अर्ज मागे घेतल्याची माहिती आहे. दिग्विजय पाटील हा पार्थ पवार यांचा मामेभाऊ आहे.
दिग्विजय पाटीलने आधी कोर्टात दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज मागे घेतल्याने नियमानुसार पुणे पोलीस दिग्विजय पाटीलला अटक करु शकतात. मात्र, पार्थ पवार यांचा नातेवाईक असलेल्या दिग्विजय पाटीलला पुणे पोलीस अटक करणार की त्याला नव्याने अटकपूर्व अर्ज दाखल करण्याची संधी देणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
मुंढवा जमीन घोटाळा प्रकरण नेमकं काय आहे?
पुण्यात मोक्याच्या ठिकाणी असलेली महार वतनाची जमीन पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीने स्वस्तात खरेदी केली होती. सध्याच्या बाजारभावानुसार या जमिनीची किंमत 1800 कोटी रुपये आहे. मात्र, ही जमीन अमेडिया कंपनीला अवघ्या 300 कोटी रुपयांमध्ये देण्यात आली. एवढेच नव्हे या व्यवहारासाठीचे 21 कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्कही माफ करण्यात आले होते. साहजिकच हे प्रकरण समोर आल्यानंतर पार्थ पवार आणि अजित पवार यांच्यावर टीकेची प्रचंड झोड उठली होती. त्यामुळे हा संपूर्ण व्यवहारच रद्द करण्यात आल्याची घोषणा तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली होती. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नेमली होती.
