याशिवाय, ८,००० हून अधिक पोलीस सतर्क ठेवण्यात आले असून, महाल आणि हंसापुरी भागात कडेकोट बंदोबस्त आहे. औरंगजेबाच्या पुतळ्याच्या दहनानंतर सोमवारी रात्री उसळलेल्या हिंसाचारामुळे सहा गुन्हे दाखल करण्यात आले असून, विश्व हिंदू परिषद (VHP) आणि बजरंग दलाच्या सदस्यांसह किमान १,२०० जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
दंगलीनंतर पोलिसांची वेगाने कारवाई
आतापर्यंत ५० हून अधिक जणांना अटक करण्यात आली आहे. राहिलेल्या आरोपींना पकडण्यासाठी १० विशेष पोलीस पथक तैनात करण्यात आली आहेत. हिंसाचारात ७० जण जखमी झाले आहेत त्यापैकी २ जणांची प्रकृती गंभीर जखमी झाले आहेत. रझा युसूफ खान (१७) आणि इमरान अन्सारी (४०) हे दोघे व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.
advertisement
महिला पोलिसांवर हल्ला, अधिकाऱ्यांवर जीवघेणा हल्ला
हिंसाचारादरम्यान दोन महिला पोलिसांवर हल्ला झाला. भालदारपुरा येथे एका महिला पोलीस अधिकाऱ्याला जमावाने वेढून तिचा गणवेश फाडण्याचा प्रयत्न केला. तसेच छेडछाड करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिने प्रतिकार करत स्वतःचा बचाव केला.
निकेतन कदम यांच्यावर कुऱ्हाडीने हल्ला
हंसापुरी येथे २०१९ बॅचचे IPS अधिकारी, झोनल DCP निकेतन कदम यांच्यावर तरुणाने कुऱ्हाडीने हल्ला केला. प्रत्यक्षदर्शींच्या मते, आरोपीने त्यांच्या मानेला लक्ष्य केले, पण त्यांनी हाताने बचाव करत गंभीर दुखापत टाळली. कदम यांच्यावर न्यू एरा हॉस्पिटलमध्ये तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली.
नागपूरचे पोलीस आयुक्त काय म्हणाले?
सोशल मीडियावर अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी विशेष सायबर पोलीस पथक तैनात करण्यात आले आहे, असे नागपूर पोलीस आयुक्त सिंगल यांनी सांगितले. तसेच, महालकडे जाणारे सर्व मार्ग बंद करण्यात आले असून संपूर्ण शहरात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले.
केंद्रीय राखीव पोलीस दलाचे कमांडंट यांच्यावरही दगडफेक, स्कॉर्पिओ गाडीचे मोठे नुकसान
केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (CRPF) सहाय्यक कमांडंट विकास कुमार झा यांच्यावर भगवागर चौकात वाहन चालवत असताना जोरदार दगडफेक करण्यात आली. त्यांच्या स्कॉर्पिओ गाडीचे मोठे नुकसान झाले.
हिंसाचारामुळे शहरात मोठे नुकसान झाले
५० हून अधिक वाहने पेटवली आणि तोडफोड करण्यात आली आहे.
दोन JCB मशीन आणि क्रेन पेट्रोल बॉम्बने पेटवून दिल्या, यावरून पूर्वनियोजित कट असल्याचा संशय
१०० हून अधिक शाळा आणि महाविद्यालये बंद.
सीबीएसई १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी वाहतुकीवर कोणतेही निर्बंध नाहीत.
पोलीस प्रशासनाची कारवाई आणि सुरक्षा उपाययोजना
सोशल मीडियावर अफवा पसरवणाऱ्यांवर सायबर पोलीस लक्ष ठेवत आहेत. महाल परिसरातील सर्व रस्ते सील करण्यात आले. नागपूर पोलिसांनी संवेदनशील भागात पथसंचलन केले. नागरिकांना घरात राहण्याचे आणि अफवा न पसरवण्याचे आवाहन नागपूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.
नागपूर पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी गस्त वाढवली असून, संवेदनशील भागात शस्त्रसज्ज पोलीस तैनात करण्यात आले आहेत. हिंसाचारानंतर पोलिसांनी ६५० हून अधिक जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.
