पती हा अनैतिक संबंधास अडसर ठरत असल्याने प्रियकराच्या मदतीने पतीचे नाक तोंड दाबून गळा आवळून खून केल्याची घटना घडलीय. आसिफ इस्लाम अन्सारी उर्फ राजाबाबु टायरवाला असे प्रियकराचे नाव आहे. तर दिशा रामटेके असं मारेकरी पत्नीचे नाव आहे.
दिशा रामटेके हिचे मृतक चंद्रसेन सोबत तेरा वर्षांपूर्वी लग्न झाले होते. त्यांना दोन मुली आणि एक सहा वर्षांचा मुलगा आहे. काही वर्षांपूर्वी चंद्रसेन याला अर्धांगवायूचा झटका आला होता. तेव्हापासून तो घरीच होता. दिशा रामटेके ही पती घरात असल्याने घरखर्च भागविण्यासाठी पाण्याची कॅन भरून विक्रीचा व्यवसाय करत होती. याच दरम्यान काही महिन्यांपूर्वी तिची आसिफ इस्लाम अन्सारी उर्फ राजाबाबू टायरवाला याच्याशी ओळख झाली. आसिफ अन्सारी हा दुचाकी दुरुस्ती आणि पंक्चर दुरुस्तीचे काम करत होता. दोघांमध्ये हळूहळू प्रेमसंबंध वाढले.
advertisement
या गोष्टीची भणक पतीला लागल्याने तो तिला वारंवार शिवीगाळ करत होता. त्यामुळे त्याचा काटा काढण्याचा प्लॅन दिशाने प्रियकर आसिफ अन्सारीच्या मदतीने घटेनच्या दिवशी आखला. त्याच्या नाका तोंडावर उशी ठेवून आणि त्याचा गळा आवळून त्याचा खून करण्यात आला. दिशांचे पती चंद्रसेन 4 जुलै रोजी घरी निपचित पडलेले दिसले. शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. सुरुवातीला नैसर्गिक मृत्यू झाल्याचा बनाव तिने केला मात्र नंतर पोस्टमॉर्टम अहवालात गळा, नाक आणि तोंड दाबल्यामुळे मृत्यू झाल्याचे उघड झाल्याने तपासाची दिशा बदलली. यात पोलिसांनी पत्नी दिशा आणि प्रियकर असिफ अन्सारीला अटक करत पुढील तपास सुरू केला आहे.
