नेमकी घटना काय?
यश झाडे हा नागपूरच्या मानेवाडा येथील जवाहर नगर परिसरातील रहिवासी होता. तो १२ वीत शिक्षण घेत होता. विशेष म्हणजे, यशच्या बोर्डाच्या परीक्षा आधीच संपल्या होत्या. मात्र, घरात कोणालाही संशय येऊ नये म्हणून तो दररोज "आज माझा पेपर आहे" असं खोटं सांगून घराबाहेर पडायचा. घरच्यांना देखील तो अभ्यासासाठी आणि परीक्षेसाठी जात असल्याचं वाटत होतं.
advertisement
घटनेच्या दिवशी १४ मार्चला तो नेहमीप्रमाणे घरातून निघाला, मात्र तो रात्री उशिरापर्यंत घरी परतला नाही. पालकांनी वारंवार त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा मोबाईल फोन बंद येत होता. काहीतरी अघटित घडल्याची शंका आल्याने कुटुंबीयांनी तातडीने हुडकेश्वर पोलीस ठाण्यात तो बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती.
मॉलच्या सुरक्षा रक्षकाला आढळला मृतदेह
दुसरीकडे, एम्प्रेस मॉल परिसरात एक तरुण गंभीर जखमी अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडलेला सुरक्षा रक्षकाच्या निदर्शनास आला होता. त्याने तातडीने पोलिसांना पाचारण केले, मात्र उपचारापूर्वीच यशचा मृत्यू झाला होता. तपासादरम्यान पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवली असता, तो बेपत्ता असलेला यश झाडे असल्याचे निष्पन्न झालं. त्याने मॉलच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याचं स्पष्ट झालं आहे.
'माईंड गेम'चा संशय आणि पोलिसांचा तपास
यशच्या आत्महत्येमागे ऑनलाइन 'माईंड गेम' किंवा टास्क आधारित खेळांचा हात असावा, तो एका इमारतीवरून दुसऱ्या इमारतीवर उडी मारत असावा, त्याच वेळी ही घटना घडली असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे. परीक्षेनंतरही तो घराबाहेर राहून नक्की काय करत होता, याचा शोध पोलीस घेत आहेत. या प्रकरणी गणेशपेठ पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. गणेशपेठ पोलीस पुढील तपास करत आहेत.
