1000 कोंबड्यांचा अचानक मृत्यू झाल्याने यंत्रणा सतर्क झाली, प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू करण्यात आली आहे. नागपूरच्या सेमिनरी हिल्स इथे मध्यवर्ती शासकीय अंडी उबवणी केंद्रात सोमवारी उशिरा बर्ड फ्लूच्या उद्रेक झाल्याची माहिती मिळाली आहे. सुमारे ८०० ते १००० पक्ष्यांचा मृत्यू झाल्यानंतर, भोपाळ येथील 'सीएसआयआर-नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हाय सिक्युरिटी ॲनिमल डिसीजेस' प्रयोगशाळेने संसर्गावर शिक्कामोर्तब केले आहे. यामुळे तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि प्रशासकीय कारवाई सुरू करण्यात आली आहे.
advertisement
बर्ड फ्लू काय आहे?
बर्ड फ्लू पक्षांमध्ये वेगानं पसरणारा आजार आहे. हा आजार सांसर्गिक असल्याने एकाच वेळी मोठ्या संख्येनं कोंबड्या, बदकं किंवा पक्षी दगावतात. जो क्वचित प्रसंगी मानवांनाही होऊ शकतो. हा आजार प्रामुख्याने H5N1 सारख्या विषाणूंमुळे होतो. बाधित पक्ष्यांच्या थेट संपर्कात आल्याने याचा प्रसार होतो. ताप, खोकला, घसा खवखवणे ही याची प्रमुख लक्षणे आहेत.
या आजाराचा सर्वात जास्त धोका कुक्कुटपालन करणाऱ्या व्यवसायिकांना आहे. संसर्ग झालेल्या पक्ष्यांच्या विष्ठा, लाळ किंवा संपर्कात आल्यास माणसांना हा आजार होऊ शकतो. ताप, खोकला, घसा खवखवणे, स्नायू दुखणे, श्वास घेण्यास त्रास आणि न्यूमोनिया ही प्राथमिक लक्षणं दिसून येतात. नागपुरात बर्ड फ्लूचा धोका असल्याने प्रशासकीय यंत्रणा देखील सतर्क झाली आहे.
काय काळजी घ्यावी?
कुक्कुटपालन करणाऱ्यांनी मास्क वापरणं अत्यावश्यक आहे.
मृत किंवा आजारी पक्ष्यांपासून दूर राहा.
चिकन, अंडी, आणि इतर पोल्ट्री उत्पादने चांगल्या प्रकारे शिजवून खाल्ल्यास संसर्गाचा धोका कमी असतो.
कच्चे किंवा अर्धवट शिजवलेले मांस खाणे टाळा.
