10 ऑगस्ट रोजी नागपूर मध्यवर्ती रेल्वे स्टेशनवर वंदे भारत एक्सप्रेसचा उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यावेळी गाडीतून विविध सामाजिक आणि सांस्कृतिक संस्थांचे पदाधिकारी, शाळकरी मुलं, एनसीसी कॅडेट्स, राजकीय नेते आणि पदाधिकाऱ्यांना प्रवास घडवला जाणार आहे. या प्रवासासाठी विशेष पास तयार करण्यात आला असून पासधारकांना मोफत प्रवास करता येणार आहे.
advertisement
वंदे भारत एक्सप्रेसमुळे पुणे-नागपूर दरम्यानचा प्रवास आता अधिक जलद आणि आरामदायक होणार आहे. सध्या इतर एक्सप्रेस गाड्यांना या प्रवासासाठी सुमारे 15 तास लागतात. मात्र वंदे भारत एक्सप्रेस केवळ 12 तासांत हे अंतर पार करणार आहे. म्हणजेच प्रवाशांचा तब्बल तीन तासांचा वेळ वाचणार आहे. यामुळे व्यावसायिक, विद्यार्थी आणि नियमित प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. पुणे ते नागपूर दरम्यान जलदगती गाडी उपलब्ध व्हावी यासाठी नागरिक अनेक वर्षांपासून मागणी करत होते. ही मागणी आता पूर्ण होणार आहे. ही गाडी नागपूरहून सोमवार आणि पुण्याहून मंगळवार वगळता आठवडाभर धावणार आहे.
ही गाडी नागपूरहून सकाळी 9 वाजून 50 मिनिटांनी सुटेल आणि त्याच दिवशी रात्री 9 वाजून 50 मिनिटांनी पुण्यात पोहोचेल. या मार्गावर अजनी (नागपूर), वर्धा, अकोला, भुसावळ, जळगाव, मनमाड, कोपरगाव, अहिल्यानगर (अहमदनगर) आणि दौंड कॉर्ड लाईन या प्रमुख स्थानकांवर गाडीचा थांबा असेल.
काही दिवसांपूर्वीच नागपूरमार्गे पुणे-रिवा साप्ताहिक गाडी सुरू झाली आहे. याशिवाय, रक्षाबंधन आणि स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर नागपूर, पुणे आणि मुंबई दरम्यान विशेष गाड्या सुरू करण्यात येत आहेत.