मिळालेल्या माहितीनुसार, नागपुरच्या सीताबर्डी येथील ‘गुलशन प्लाझा’ हॉटेलचे मालक जावेद अख्तर हे त्यांच्या कुटुंबीयांसह २२ सप्टेंबर रोजी युरोप सहलीसाठी गेले होते. फ्रान्समधील पर्यटन आटोपून हे कुटुंब इटलीला पोहोचले होते. नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच होते आणि कुटुंबाच्या आनंदी प्रवासाला दुर्दैवी वळण मिळाले. गुरुवारी सकाळी ९ वाजता पर्यटनासाठी जात असताना, त्यांच्या नऊ आसनी मिनीबसला इटलीतील ग्रोसेटोजवळ भीषण अपघात झाला. हा अपघात इतका गंभीर होता की, यात अख्तर पती-पत्नी यांचा जागीच मृत्यू झाला.
advertisement
अपघाताची माहिती मिळताच अख्तर कुटुंबाचे दोन नातेवाईक तातडीने मदतीसाठी इटलीला रवाना झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने रोममधील भारतीय दूतावासाशी संपर्क साधून समन्वय साधला. मृतदेह भारतात आणणे आणि जखमी मुलांवर योग्य उपचार करणे यासाठी त्यांनी आवश्यक प्रयत्न केले.
सिव्हिल लाइन्स येथील अख्तर कुटुंबाच्या निवासस्थानासमोर जमलेल्या शोकाकूल नातेवाइकांनी दिलेल्या माहितीनुसार, जावेद अख्तर आणि त्यांचे कुटुंब दरवर्षी विदेश सहलीला जात असत. मात्र, यंदाच्या सहलीने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या अपघातामुळे परिसरातील नागरिकांकडून हळहळ व्यक्त होत असून, जखमी मुलांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थना केली जात आहे.