वृषभ फरकुंडे, प्रतिनिधी नागपूर: नागपूर शहरातील नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इथं दारूच्या नशेत असलेल्या एका तरुणाची दोघांनी निर्घृण हत्या केली आहे. आरोपींनी दगडाने ठेचून तरुणाचा खून केला आहे. हत्येची ही घटना उघडकीस येताच परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत दोन संशयितांना अटक केली आहे. घटनेचा पुढील तपास सुरू आहे.
advertisement
राजेश धनविजय असं हत्या झालेल्या ३२ वर्षीय तरुणाचं नाव आहे. पैशांच्या वादातून ही हत्या झाल्याचं प्राथमिक तपासातून समोर आलं आहे. याप्रकरणी नंदनवन पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
नेमके काय घडले?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदनवन भागातील भाऊराव अवसरे यांच्या घरी राजेश धनविजय आणि त्याचे काही मित्र नियमितपणे दारू पिण्यासाठी एकत्र येत असतात. सोमवारी रात्रीही ते सर्वजण नेहमीप्रमाणे दारू पीत बसले होते. दारूच्या नशेत असतानाच त्यांच्यात पैशांवरून जोरदार वाद सुरू झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, दोन आरोपींनी राजेशच्या डोक्यात दगड घालून त्याला गंभीर जखमी केले. या हल्ल्यात राजेशचा जागीच मृत्यू झाला.
सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच नंदनवन पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून तो शवविच्छेदनासाठी पाठवला.
बहिणीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल
मृत राजेश धनविजयची बहीण नगिना यांनी नंदनवन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी तत्काळ तपासाची चक्रे फिरवली. मिळालेल्या माहितीनुसार आणि पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्यांची कसून चौकशी सुरू आहे. हा खून नेमका कोणत्या कारणातून झाला, यामागे आणखी काही व्यक्तींचा सहभाग आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत. दारूच्या नशेत घडलेल्या या घटनेमुळे परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांकडून लवकरच या प्रकरणाचा उलगडा होण्याची शक्यता आहे.
