वृषभ फरकुंडे, प्रतिनिधी नागपूर: नागपुरातील इमामवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जाकतरोडी परिसरातून एक हादरवून टाकणारी बातमी समोर आली आहे. या भागात बुधवारी रात्री उशिरा एका रेकॉर्डवरील गुन्हेगाराची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. दोन अल्पवयीन मुलांनी त्याला रस्त्यात गाठून दगडाने ठेचलं आहेत. एका रेकॉर्डवरील गुन्हेगाराची अशाप्रकारे हत्या झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. नीलेश उर्फ बाळा अंबादरे (Nilesh alias Bala Ambadare) असं खून झालेल्या व्यक्तीचं नाव आहे.
advertisement
पैशांच्या वादातून झाला खून
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत नीलेश उर्फ बाळा अंबादरे हा स्थानिक गुन्हेगार असून, त्याच्यावर विविध पोलीस ठाण्यांमध्ये गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. प्राथमिक तपासात, नीलेश अंबादरे आणि दोन अल्पवयीन आरोपींमध्ये काही दिवसांपासून पैशांवरून वाद सुरू होता. हा वाद विकोपाला गेल्यानंतर आरोपींनी नीलेशला संपवण्याचा कट रचला.
बुधवारी रात्री उशिरा जाकतरोडी परिसरात आरोपींनी नीलेश अंबादरेला गाठले. यावेळी दोघांनी अतिशय क्रूरपणे नीलेश अंबादरेला दगडाने ठेचलं. हा हल्ला इतका भयंकर होता, की नीलेशचा जागीच रक्ताच्या थारोळ्यात पडून मृत्यू झाला. या घटनेनंतर आरोपींनी लगेच तेथून पळ काढला.
दोन अल्पवयीन आरोपी ताब्यात
या घटनेची माहिती मिळताच इमामवाडा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. पोलिसांनी तातडीने तपासाची चक्र फिरवत दोन अल्पवयीन आरोपींना पकडण्यासाठी पोलीस पथकं रवाना केली आहेत. पैशांच्या किरकोळ वादातून ही निर्घृण हत्या झाल्याचे समोर आले आहे.
या हत्येमुळे जाकतरोडी परिसरात तणावाचे आणि दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास करत आहेत. रेकॉर्डवरील गुन्हेगाराची अशा प्रकारे हत्या झाल्याने नागपूर शहरात खळबळ उडाली आहे.