प्रणव अनिल आगलावे असं मृत पावलेल्या १४ वर्षीय मुलाचं नाव आहे. घटनेच्या दिवशी तो आपल्या काही मित्रांसोबत क्रिकेट खेळायला गेला होता. पण क्रिकेट खेळताना अनर्थ घडून त्यांचा मृत्यू झाला.
नेमकी घटना काय?
भिवापूर येथील ही घटना बुधवारी (१५ ऑक्टोबर) संध्याकाळी पाच वाजताच्या सुमारास घडली. प्रणव आगलावे हा भिवापूर महाविद्यालयाच्या मैदानावर आपल्या काही मित्रांसोबत क्रिकेट खेळत होता. खेळ सुरू असताना अचानक चेंडू वेगाने प्रणवच्या छातीला लागला. चेंडूचा जोरदार आघात होताच प्रणव जमिनीवर कोसळला.
advertisement
प्रणव कोसळल्याचे पाहताच त्याच्या मित्रांनी कोणतीही वेळ न दवडता त्याला तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर प्रणवला मृत घोषित केले. अचानक झालेल्या या घटनेमुळे क्रिकेट खेळणाऱ्या मित्रांना आणि भिवापूर परिसरातील नागरिकांना मोठा धक्का बसला.
दोन महिन्यांत कुटुंबावर दुहेरी आघात
प्रणव आगलावे हा भिवापूर येथील राष्ट्रीय विद्यालयात नववीत शिकत होता. त्याचे वडील अनिल आगलावे यांचं दोन महिन्यांपूर्वी अकाली निधन झालं होतं. वडिलांच्या जाण्याचे दुःख ताजं असतानाच, आता प्रणवचाही दुर्दैवी पद्धतीने मृत्यू झाला आहे. यामुळे आगलावे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. एकाच कुटुंबातील पिता-पुत्राच्या अकाली निधनामुळे भिवापूर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.