प्रशांत कुंवरलाल मसुरके असं मृत पावलेल्या २५ वर्षीय तरुणाचं नाव आहे. घटनेच्या दिवशी शनिवारी प्रशांत नगरधन येथील आठवडी बाजारात गेला होता. याठिकाणी तो दारुच्या नशेत असल्याने तोल जाणून उकळत्या तेलाच्या कढईत पडला. यात गंभीर झालेल्या प्रशांतचा दुसऱ्या दिवशी रविवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नगरधन येथे आठवडी बाजारात विक्की जनबंधू नावाचा दुकानदार भजी तळत होता. त्यासाठी त्याने तेलाची कढई चुलीवर ठेवली होती. त्याचवेळी दारूच्या नशेत असलेला प्रशांत मसुरके तिथे आला. दारूच्या धुंदीत असल्यामुळे त्याचा तोल गेला आणि तो थेट उकळत्या तेलाच्या कढईत पडला.
advertisement
कढईत पडल्यामुळे प्रशांत गंभीररित्या भाजला. त्याच्या शरीराचा मोठा भाग भाजल्याने तो वेदनेने विव्हळू लागला. हे पाहून आजूबाजूच्या नागरिकांनी आणि दुकानदाराने तत्काळ धाव घेतली. त्यांनी त्याला तातडीने कढईतून बाहेर काढले आणि उपचारासाठी रामटेक उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.
प्रशांतची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी नागपूर येथील मेडिकल महाविद्यालयात हलवण्यात आले. तिथे डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार सुरू केले, मात्र भाजण्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे आणि दुखापत गंभीर असल्याने रविवारी उपचारादरम्यान त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी रामटेक पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास सुरू आहे.