सापळा रचून पोलिसांनी पकडलं
मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, नालासोपारा पूर्वेतील प्रगती नगर परिसरात एक परदेशी नागरिक अमली पदार्थांची विक्री करण्यासाठी येणार होता. त्यानुसार तुळिंज पोलिसांच्या पथकाने या भागात सापळा रचला. संशयास्पद हालचाली करणाऱ्या ३७ वर्षीय नायजेरियन नागरिकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असता, त्याच्याकडे अमली पदार्थ असल्याचे आढळून आले.
फॉरेन्सिक पथकाकडून तपासणी
पोलिसांनी या कारवाईदरम्यान पारदर्शकता राखण्यासाठी फॉरेन्सिक पथकालाही घटनास्थळी पाचारण केले होते. जप्त करण्यात आलेल्या पांढऱ्या रंगाच्या पावडरची फॉरेन्सिक पथकाने प्राथमिक तपासणी केली असता, ते ६२ ग्रॅम मॅफेड्रोन असल्याचे निष्पन्न झाले. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या मालाची किंमत १२ लाख रुपयांहून अधिक आहे.
advertisement
ही यशस्वी कारवाई तुळिंज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या विशेष पथकाने केली. पोलिसांनी अमली पदार्थांसह आरोपीला अटक केली असून, त्याच्याकडे भारताचा वैध व्हिसा आणि पासपोर्ट होता का, तसेच हे ड्रग्ज तो कोणाला विकणार होता, याचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
नालासोपारा परिसरात वाढत्या गुन्हेगारीवर वचक बसवण्यासाठी आणि तरुणाईला अमली पदार्थांच्या विळख्यातून वाचवण्यासाठी पोलिसांकडून अशाच प्रकारे कठोर पावले उचलली जातील, असे संकेत पोलीस प्रशासनाने दिले आहेत.
