महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या अशोक खरातविरुद्ध तक्रार करणाऱ्या महिलांची संख्या वाढू लागली आहे. सोमवारी सायंकाळपर्यंत अशोक खरात याच्याविरुद्ध सहा गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. युवतीवर लग्नाआधी आणि लग्नानंतर खरातने नाशिक येथील त्याच्या कार्यालयात अत्याचार केले. याविरोधात पीडितेने सरकारवाडा पोलीस ठाण्यात तक्रार केल्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर खरात यास अटक झाली. नाशिक पोलिसांच्या आवाहनानंतर अनेक पीडित महिला तक्रारीसाठी पुढे येऊ लागल्या आहेत. खरातची पोलीस कोठडी आज संपल्यामुळे त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी न्यायालयाने २९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी वाढवली.
advertisement
सरकारी वकिलांनी काय काय सांगितले?
विशेष पोलीस पथकातील अधिकारी सूर्यवंशी यांनी न्यायालयाला खरात याच्यासंदर्भाने माहिती दिली. अशोक खरात हा स्वत:ला सिद्ध पुरूष म्हणवून घ्यायचा. येणाऱ्या महिलांना तो पेढा आणि विशेष प्रकारचे पाणी प्यायला द्यायचे. ६ लाख ५३ हजारांची रोकड आणि लॅपटॉप जप्त केला, अशी माहिती सरकारी वकिलांनी दिली. तसेच खरात याच्या फार्महाऊसवर पिस्तुलाच्या ५ पुंगळ्या सापडल्याचेही त्यांनी सांगितले. खरातने नरबळी दिल्याचा संशयही सरकारी वकिलांनी न्यायालयात उपस्थित केला. खरात वाघ आणि साप लोकांना दाखवून त्यांच्या मनात भीती निर्माण करायचा. हरणाची काळी आणि पांढरी कस्तुरी लोकांना द्यायचा. खरात प्रकरणी वन कायदा देखील लागू शकतो, असे न्यायालयाच्या निर्दशनास सरकारी वकिलांनी आणून दिले. ईशानेश्वर मंदिरातील सिद्धपूजेचा तपास बाकी असल्याचे सांगत सरकारी वकिलांनी खरातला सात दिवसांची पोलीस कोठडी द्या, अशी मागणी केली. खरात नेमकी कोणती पूजा करायची, विधी कसे आणि कोणते होते, याची चौकशी करणे बाकी असल्याचे सरकारी वकिलांनी सांगितले.
खरातचे वकिलांनी काय युक्तिवाद केला?
खरात प्रकरणात पेन ड्राईव्हचा कुठेही उल्लेख नाही. एसआयटीचा तपास झाला आहे. त्याच्याकडून कोणतेही कागदपत्रे हस्तगत करण्याचे बाकी नाही. त्यामुळे खरातला पुन्हा पोलीस कोठडी वाढविण्याची गरज नाही, असे खरातच्या वकिलांनी न्यायालयात सांगितले.
