मिळालेल्या माहितीनुसार, शदाब तांबोळी हा 18 फेब्रुवारी रोजी घरातले सामान आणण्यासाठी घराबाहेर पडला होता. मात्र, तो परत न आल्याने कुटुंबीयांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला. नातेवाईक, मित्रमंडळी तसेच संभाव्य ठिकाणी शोध घेऊनही शादाब सापडला नाही. अखेर निफाड पोलीस ठाण्यात त्याची बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. पोलिसांकडून तपास सुरू असतानाच आज चांदवड तालुक्यातील परसूल परिसरात नदीच्या पुलाखाली पाण्यात तरंगताना त्याचा मृतदेह आढळून आला.
advertisement
अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार
घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. पाहणीदरम्यान शदाबच्या तोंडावर, हातपायांवर आणि कंबरेला वजनदार डंबेल्स बांधलेले आढळून आले. या अमानुष कृत्यामुळे हत्या नियोजनपूर्वक आणि निर्दयतेने करण्यात आल्याचे स्पष्ट होते. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून, अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत.
कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला
ऐन रमजान महिन्यात घडलेल्या या घटनेमुळे शदाबच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कुटुंबीयांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा आहे. आपल्या मुलाचा अशा क्रूर पद्धतीने खून करणाऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. परिसरातील नागरिकांनीही या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला असून, दोषींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
गुन्हेगारी प्रवृत्तीवर गंभीर प्रश्नचिन्ह
या घटनेने शहरात वाढत चाललेल्या गुन्हेगारी प्रवृत्तीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. पोलिस तपासातून लवकरात लवकर सत्य समोर यावे आणि शदाबला न्याय मिळावा, हीच अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
