हरि प्रकाश शर्मा असं लाचखोर अधिकाऱ्याचं नाव आहे. ते सीजीएसटी आणि केंद्रीय उत्पादन शुल्क आयुक्तालयाचे अधीक्षक आहेत. केंद्रीय अन्वेषण विभागाने अर्थात सीबीआयने बुधवारी (१५ ऑक्टोबर २०२५) नाशिक जिल्ह्यात ही मोठी कारवाई केली. हरि प्रकाश शर्मा यांना ५ लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक केली आहे. एका खासगी कंपनीविरोधात कायदेशीर कारवाई न करण्याच्या बदल्यात त्यांनी ५० लाख रुपयांची लाच मागितली होती.
advertisement
या प्रकरणी मंगळवारी सीबीआयने लाचखोरीचा हा गुन्हा दाखल केला होता. एका खाजगी कंपनीच्या आयजीएसटी इनपूट कर प्रकरणात कोणतीही कायदेशीर कारवाई न करण्याच्या बदल्यात आरोपी अधिकाऱ्याने तक्रारदाराकडून ५० लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. नंतर, आरोपी अधीक्षक हरि प्रकाश शर्मा यांनी ही रक्कम ५० लाख रुपयांवरून ही डील २२ लाख रुपयांमध्ये अंतिम केली होती.
तक्रार मिळाल्यानंतर सीबीआयने रचला सापळा
सीबीआयच्या तक्रारीनुसार, हरि प्रकाश शर्मा यांनी मंगळवारी (१४ ऑक्टोबर २०२५) तक्रारदाराला ५ लाख रुपयांची लाचेची रक्कम देण्यास सांगितली होती. त्यानंतर त्यांनी शुक्रवारी लाचेची उर्वरित १७ लाखांची रक्कम देण्यास सांगितलं होतं. पण तक्रारदाराने याबाबतची तक्रार सीबीआयकडे केली. तक्रारीनंतर सीबीआयने आरोपी अधीक्षकाला रंगेहाथ पकडण्यासाठी सापळा रचला आणि त्याला नाशिकमधील त्याच्या कार्यालयाबाहेर ५ लाख रुपयांची लाच घेताना पकडले.
अधिकाऱ्याच्या अटकेनंतर सीबीआयचा छापा
हरी प्रकाश शर्माच्या अटकेनंतर, सीबीआयने आरोपीच्या निवासस्थानावर आणि कार्यालयाच्या परिसरात व्यापक छापे टाकले. छाप्यादरम्यान, सीबीआयने १९ लाख रुपयांची रोख रक्कम आणि अनेक गुन्हेगारी कागदपत्रे जप्त केली.
न्यायालयाकडून आरोपीला पोलीस कोठडी
सीबीआयने आरोपी अधिकारी हरी प्रकाश शर्मा यांना बुधवारी पुणे न्यायालयात हजर केलं. जिथे न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. एका बड्या अधिकाऱ्याने अशाप्रकारे ५० लाखांची लाच मागितल्याने नाशिक जिल्ह्यात हे प्रकरण चांगलंच चर्चेत आहे.