पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अशोक खरातने केवळ महिलांचं लैंगिक शोषणच नाही केलं तर त्याने तुर्की मधाच्या नावाखाली खरातने अनेक नामांकित उद्योजक आणि राजकीय नेत्यांना गंडा घातल्याची धक्कादायक माहिती तपासात समोर आली आहे.
९ लाखांना विकायचा एक किलो मध!
अशोक खरात हा 'एल्विश हनी' नावाच्या मधाची विक्री करायचा. हे मध अतिशय दुर्मिळ असून ते तुर्कीमधील खोल समुद्रात असलेल्या गुहेतून काढले जाते, असा बनावट दावा तो करायचा. धक्कादायक बाब म्हणजे, लैंगिक समस्या किंवा शारीरिक कमजोरी असलेल्या व्यक्तींना लक्ष्य करून, हे मध अत्यंत कामोत्तेजक आणि शक्तिवर्धक असल्याचं सांगून तो त्यांची दिशाभूल करायचा. १ किलो मधाच्या बाटलीसाठी तो तब्बल ९ लाख रुपये उकळत असल्याची माहिती समोर आली आहे.
advertisement
बडे उद्योजक आणि राजकीय नेते जाळ्यात
खरातच्या या जाळ्यात केवळ सामान्य जनताच नाही, तर अनेक बडे उद्योजक आणि प्रतिष्ठित राजकीय नेतेही अडकले आहेत. लैंगिक अडचणींवर खात्रीशीर उपाय म्हणून खरात या मधाची जाहिरात करायचा. प्रतिष्ठीत व्यक्ती आपल्या समस्या उघडपणे सांगू शकत नसल्याचा फायदा घेत, त्याने या मधाच्या विक्रीतून कोट्यवधींची माया जमवली आहे.
ब्लॅक मनी 'व्हाईट' करण्याचे रॅकेट
केवळ फसवणूकच नाही, तर या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार झाल्याचेही तपासात निष्पन्न झालं आहे. महागड्या दराने मध विक्री करून आलेली ही अफाट रक्कम खरात थेट स्वतःच्या नावावर न घेता, त्याच्या मालकीच्या ट्रस्टच्या नावे जमा करून घेत असे. यामार्फत 'ब्लॅक मनी' कायदेशीर मार्गाने 'व्हाईट' करण्याचा त्याचा डाव होता, असं आता प्राथमिक तपासातून स्पष्ट झालं आहे.
या प्रकरणी पोलीस आता अधिक सखोल तपास करत असून, खरातने आणखी किती लोकांची फसवणूक केली आहे आणि या आर्थिक व्यवहारांची पाळेमुळे कुठेपर्यंत विस्तारलेली आहेत, याचा शोध घेतला जात आहे.
