मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी एक युवक धावत पळत गजानन चौक परिसरातील कोमटी गल्लीत आला होता. दोन जण दुचाकीने पाठलाग करत होते. तो कोमटी गल्लीत आला असता दुचाकीवरील तरुणांनी त्याला अडवलं. त्याची कॉलर पकडून त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. दुचाकीवरून उतरलेल्या एका संशयिताने तातडीने धारदार शस्त्राने युवकाच्या पोटावर वार करण्याचा प्रयत्न केला.
advertisement
मात्र, त्याचवेळी परिसरातील काही नागरिकांनी हा थरार पाहिला आणि त्यांनी त्वरित हस्तक्षेप करत आरडाओरड करण्यास सुरुवात केली. तसेच 'जाऊ दे रे, त्याला सोडून दे' असं म्हटलं. नागरिकांनी हटकल्यामुळे हल्लेखोरांना आपला इरादा पूर्ण करता आला नाही आणि ते तातडीने घटनास्थळावरून पसार झाले.
हा संपूर्ण थरार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झाला आहे, तर काही नागरिकांनी आपल्या मोबाईलमध्येही या घटनेचे चित्रण केले आहे. घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. संशयित फरार झाल्याने पोलिसांनी आता सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईलमध्ये चित्रित झालेल्या व्हिडीओच्या आधारे दोघा हल्लेखोरांचा कसून शोध सुरू केला आहे. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे पंचवटी परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.