नाशिक - प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नाशिक नगरीत अनेक रत्न उदयास आले आहेत. कवी कुसुमाग्रजांच्या या पावनभूमीतून अनेक नामवंत कलाकारांनी विविध कलागुणांच्या माध्यमातुन नाशिकचे नाव सातासमुद्रापार नेले आहे. आज अशाच एका ध्येयवेडया तरुणी बाबत आपण जाणून घेणार आहोत. या तरुणीने आपल्या कलेच्या जोरावर नाशिकचे नाव साता समुद्रापार नेले आहे. भारतातील पहिली सूक्ष्मचित्रकार म्हणून या तरुणीची ओळख झाली आहे. ऐश्वर्या औसरकर असे या तरुणीचे नाव आहे.
advertisement
डोळ्यांनाही दिसणार नाही अशा बारीक वस्तूंवर व दैनंदिन जीवनातील आहारातील वापरण्यात येणाऱ्या विविध प्रकारच्या आकाराने लहान असणाऱ्या कडधान्यांवर ऐश्वर्या ही विविध राजकीय, सामाजिक व शैक्षणिक स्तरातील व्यक्तीचे तसेच देवी-देवतांचे, निसर्गाचे नयनरम्य रंगीत चित्र काढते. विशेष म्हणजे कुठल्याही प्रकारच्या भिंगाचा वापर न करता ती हे चित्र साकारते.
अखंड महाराष्ट्रचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर प्रेम करणारे मावळे महाराजांची कलाकृती साकारुन महाराजांना मानवंदना देत असतात. मात्र, नाशिकमधील ऐश्वर्या औसरकर या तरुणीने चक्क छत्रपती शिवाजी महाराजांचे रंगीत चित्र दैनंदिन वापरातील फोडणीसाठी वापरण्यात येणाऱ्या आणि डोळ्यांनाही दिसणार नाही अशा एका बारीक मोहरीवर साकारले आहे. या चित्राचे मोजमाप केले असता ते अवघे 1.40 मीमी इतके आहे.
विशेष म्हणजे हे चित्र काढण्यासाठी तिने कुठल्याही भिंगाचा अथवा दुर्बिणीचा वापर केला नाही आणि फक्त अर्ध्या तासात हे चित्र काढले. ऐश्वर्या हिच्या या कामगिरीमुळे तिचे नाव इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि लंडनमधील प्रसिद्ध नामांकित कंपनी वर्ल्ड वॉर्ड बुक ऑफ रेकॉर्ड या संस्थेमध्ये सूक्ष्मचित्रकार म्हनून नोंदविण्यात आले आहे.
लोकल18 शी बोलताना तिने तिच्या या छंदबाबत सांगितले. यावेळी तिने सांगितले की, लहानपणापासून चित्रकलेची आवड असताना अनेक नवीन प्रयोग मी चित्रकलेत करत असते. सातवीमध्ये असताना गव्हावर पहिले श्रीकृष्णाचे चित्र साकारले होते. तो प्रयोग यशस्वी झाल्यानंतर मला जून प्रोत्साहन मिळाले. त्यानंतर बारावीचे शिक्षण घेऊन चित्रकलेमध्ये ATD डिप्लोमा केल्यानंतर मी असे अनेक प्रयोग करत असते.
आतापर्यंत जवळपास 500 ते 700 चित्र अशा अनेक कडधान्यावर काढली आहेत. कपडे शिवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या दोऱ्यावरही रामायण हे नाव काढल्याची माहिती तिने यावेळी दिली. तर तिच्या या सर्व कलाकृती लवकरच एका संग्रहालयात पाहायला मिळणार असल्याचे तिने यावेळी सांगितले. नवरात्री निमित्तही तिने नवदुर्गेचे सूक्ष्म चित्र साकारले आहे. हे चित्र तुम्हाला पाहायचे असल्यास तुम्ही नाशिकमधील इंदिरा नगर या ठिकाणी असलेल्या पेरेसाईड अपार्टमेंटच्या बाजूला त्यांच्या निवासस्थानी पाहू शकतात, अशी माहिती तिने यावेळी दिली.