नवी मुंबईच्या बेलापूर परिसरात काही अल्पवयीन मुलींकडून वेश्याव्यवसाय करून घेतला जात असल्याची गुप्त माहिती नवी मुंबई पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला मिळाली होती. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी छापेमारी केली. तेव्हा १६ आणि १४ वर्षांच्या दोन अल्पवयीन मुलींकडून वेश्याव्यवसाय करवून घेतला जात असल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं. पोलिसांनी खोलात जाऊन तपास केला असता यामागे याच मुलींचा नराधम बाप असल्याचं उघड झालं.
advertisement
दीड लाखांत मुलीचा सौदा
मिळालेल्या माहितीनुसार, कोपरखैरणे येथे राहणारा हा नराधम पिता आपल्याच मुलींचा सौदा करत होता. 'हरिष' नावाचा एक दलाल या अल्पवयीन मुलींना ग्राहकांकडे पोहोचवण्याचं काम करत असे. धक्कादायक बाब म्हणजे, एका मुलीचा सौदा चक्क दीड लाख रुपयांपर्यंत ठरवला जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीची गांभीर्याने दखल घेत पोलिसांनी तातडीने तपासाची चक्र फिरवली.
पोलिसांनी रचला बनावट ग्राहकाचा सापळा
वरिष्ठ पोलीस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी या रॅकेटचा पर्दाफाश केला. पोलिसांनी स्वतः बनावट ग्राहक बनून दलालाशी संपर्क साधला. २० फेब्रुवारी रोजी रात्री बेलापूर येथील 'के स्टार' हॉटेल परिसरात व्यवहार निश्चित झाला. ठरल्याप्रमाणे दलाल मुलींना घेऊन तिथे पोहोचला असता, दबा धरून बसलेल्या पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत दलाल हरिष विकास छारी (वय २७) याला रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले.
तपासात पित्याचे नाव समोर
पोलिसांनी जेव्हा ताब्यात घेतलेल्या मुलींची विचारपूस केली, तेव्हा जे सत्य समोर आले त्याने पोलीसही अवाक झाले. या दोन्ही पीडित मुलींचा जन्मदाता पिताच या संपूर्ण कृत्यात सामील असल्याचे निष्पन्न झाले. केवळ पैशांच्या हव्यासापोटी या पित्याने आपल्या दोन्ही कोवळ्या मुलींना दलालाच्या स्वाधीन केले होते.
याप्रकरणी पोलिसांनी अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा (PITA) आणि बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (POCSO) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सध्या दलाल पोलिसांच्या कोठडीत असून, नराधम पिता फरार आहे. पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.
