बृहन्मंबई महानगरपालिका निवडणूक महायुतीत लढविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने प्रयत्न केले. परंतु नवाब मलिक यांचे नेतृत्व मान्य नसल्याचे सांगत भाजपने राष्ट्रवादीचा प्रस्ताव धुडकावून लावला. परंतु मुंबईतील मुस्लीम मतदार डोळ्यासमोर ठेवून मलिक यांचे नेतृत्व बाजूला करणे, राष्ट्रवादीने पसंत केले नाही. त्याऐवजी त्यांची लेक आमदार सना मलिक यांच्याकडे नेतृत्वाची धुरा देऊन मुंबई पालिकेला राष्ट्रवादी काँग्रेस निवडणुकीला सामोरे जाणार आहे. अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मुंबई महापालिकेत स्वबळावर १०० जागा लढवणार आहेत, अशी घोषणा आमदार सना मलिक यांनी केली.
advertisement
राष्ट्रवादीच्या यादीत मलिकांच्या कुटुंबाला मानाचं स्थान
नवाब मलिक यांचे भाऊ कप्तान मलिक, त्यांची सुन बुशरा मलिक आणि बहीण सईदा खान यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मुंबई महापालिकेच्या मैदानात उतरवले आहे. मुस्लीम बहुल भागातून तिन्ही उमेदवार निवडून लढविणार आहेत. राष्ट्रवादीच्या पहिल्या यादीत मलिक कुटुंबाला मानाचे स्थान देण्यात आल्याचे बोलले जाते.
कोणत्या प्रभागातून कोण लढणार?
नवाब मलिक यांचे बंधू कप्तान मलिक प्रभाग क्रमांक १६५, नवाब मलिक यांची बहीण सईदा खान प्रभाग क्रमांक १६८, तर कप्तान मलिक यांची सून बुशरा मलिक प्रभाग क्रमांक १७० निवडणुकीला सामोरे जाणार आहे.
भाजपचा विरोध झुगारून मलिक यांच्याकडेच नेतृत्व, तिघांना उमेदवारीही
नवाब मलिक यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेतृत्व असेल तर आम्हाला युतीसाठी चालणार नाही, असे जाहीरपणे भाजपने ठकणकावून सांगितले. पण तितक्याच जोरदारपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेही मलिक यांच्याकडेच नेतृत्व ठेवू, असे संकेत दिले. तसेच मलिक यांच्या नेतृत्वाच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादीने भाजपशी जाणे टाळले. अखेर भाजपच्या नाकावर टिच्चून उमेदवारी यादीत मलिक कुटुंबातील तिघांना राष्ट्रवादीने संधी दिली.
