ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी एकसंध राष्ट्रवादी असताना आणि त्यानंतरही अनेकदा पक्षात भाकरी फिरविण्याची घोषणा केली. पहिल्या फळीतील नेत्यांकडील कार्यभार कमी करून पक्षात युवा सहकाऱ्यांकडे मोठी जबाबदार देऊ, असे शरद पवार यांनी सांगितले. परंतु तशा अर्थाने पक्षात काहीच निर्णय झाले नाहीत. महत्वाकांक्षी असलेल्या रोहित पवार यांना मात्र पक्षातील महत्वाची जबाबदारी स्वत:च्या खांद्यावर घ्यायची आहे. अगदी आजच्या राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनीही मी केवळ आमदार आहे, पक्षाचे कोणतेही पद माझ्याकडे नाही, असे विधान त्यांनी केले. त्यांच्या विधानातून आमदारकीचे महत्त्व कमी आणि पद नसल्याची बोच जास्त जाणवते. त्यामुळे प्रदेशाध्यक्षपदाचा कार्यकाळ संपूनही जयंत पाटील यांच्याकडे पद कसे? असा अप्रत्यक्ष सवाल रोहित पवार अनेकदा करताना दिसून येतात.
advertisement
रोहित पवार यांना जयंत पाटील यांचे पद का बोचत आहे?
रोहित पवार यांनी राजकारणात प्रवेश करण्याआधी बारामती अॅग्रोची जबाबदारी सांभाळली. सहकार समजून घेत असताना त्यांनी देशभ्रमंती केली. देशभरात फिरून त्यांनी सहकार, साखरप्रश्न, साखर उद्योगावरील आधारित व्यवसाय आणि त्यासंबंधी प्रश्न आदींची यशोचित माहिती घेतली. सुरुवातीच्या काळात शरद पवार यांच्यासोबत राहून त्यांनी महाराष्ट्रही व्यवस्थित समजून घेतला. हे सगळे सांगण्याचे कारण म्हणजे त्यांच्या मनी असलेली राजकीय महत्त्वाकांक्षा. पक्षातील प्रमुख पद गेली सात वर्षे जर जयंत पाटील यांच्याकडे आहे तर मग आपल्याला कधी आणि कशी संधी मिळेल? असे त्यांना वाटते. त्याचमुळे जयंत पाटील यांचे पद रोहित पवार यांना बोचत आहे.
रोहित पवार यांना प्रदेशाध्यक्ष व्हायचे आहे का?
पक्षात नव्या चेहऱ्यांना संधी दिली पाहिजे, असे विधान संधी मिळेल तिथे रोहित पवार करीत असतात. याचाच अर्थ पक्षातील प्रमुख पदांवर युवकांना काम करण्याची जबाबदारी द्यावी, असाच त्यांचा रोख असतो. शरद पवार यांनी अगदी विद्यार्थीदशेपासून राजकीय कारकीर्दीला सुरूवात केली. त्या तुलनेत तिशीत असताना रोहित पवार राजकारणात आले. त्यामुळे जमेल तेवढ्या काळात राजकीय पदांना गवसणी घालून भरारी घ्यावी, असे रोहित पवार यांना वाटते, असे त्यांचे समर्थक सांगतात. त्यामुळे जर जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला तर त्या पदावर रोहित पवार दावा करू शकतात, असेही पक्षातील सूत्र सांगतात. किंबहुना तशा आशयाची वक्तव्ये अप्रत्यक्षरित्या रोहित पवार यांनीच केली आहेत.
रोहित पवार यांच्या वाटेतील जयंतराव काटा बनलेत का?
जयंत पाटील हे गेली ३५ वर्षे राज्याच्या राजकारणात आहेत. विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे, अशोकराव चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण अशा दिग्गज मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात जयंत पाटील यांनी काम केले आहे. तसेच वसंतदादा पाटील, सुधाकरराव नाईक, शरद पवार आदींचे राजकारण त्यांनी अगदी जवळून पाहिले आहे. राजकारणात कोणती गोष्ट किती ताणून धरायची आणि कधी सोडायची? हे जयंत पाटील यांना नेमके आहे. अनेक खडतर प्रसंगातून जयंत पाटील यांनी आतापर्यंतच्या राजकीय कारकीर्दीत वाट काढली आहे. त्यामुळे आतापर्यंतच्या राजकीय कारकीर्दीचा अनुभव गाठीशी घेऊन जयंत पाटील यांनी गेल्या काही वर्षांपूर्वी प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. राष्ट्रवादी सत्तेत असताना कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना सत्तेतील वाटा देऊन आणि विरोधात असताना संघटनकौशल्य पणाला लावून जयंत पाटील यांनी पक्ष सांभाळला. अगदी पक्षात फूट पडल्यानंतरही लोकसभा निवडणुकीत ८ खासदार निवडून आणले. यात शरद पवार यांच्याबरोबर जयंत पाटील यांचाही सिंहाचा वाटा आहे. अशा मुरब्बी नेत्याला दूर सारून रोहित पवार यांचे संघटनेवर वर्चस्व मिळविण्याचे प्रयत्न आहे. राष्ट्रवादी पक्षाने जर प्रदेशाध्यक्षपदाची माळ गळ्यात टाकली तर विरोधी पक्षाचा प्रमुख चेहरा बनून, संपूर्ण महाराष्ट्र फिरून आपले क्षितीत विस्तारण्याचा मनसुबा रोहित पवार यांचा आहे. जर विरोधी पक्षात आक्रमकपणे काम केले तर आगामी काळातील राजकारणात प्रमुख पदे भूषविण्याची संधी चालून येईल, अशी साहजिक मानसिकता रोहित पवार यांची असू शकते. त्यामुळेच सध्या तरी रोहित पवार यांना इप्सित स्थळी पोहोण्यासाठीच्या मार्गात जयंत पाटील यांचा अडसर आहे. परंतु प्रश्न उरतो तो कुवतीचा...! या प्रश्नाचे उत्तर आगामी काळातले त्यांचे राजकारणच देईल.
शरद पवार यांनी जयंतरावांकडेच प्रदेशाध्यक्षपद का ठेवले आहे? साहेबांवर कशाची मोहिनी?
पक्ष एकसंध असताना आणि फूट पडल्यानंतरही जयंतरावांनी पक्षाचे नेतृत्व केले. कधी यश तर कधी अपयश वाट्याला आले. परंतु अशा स्थितीतही त्यांनी पक्षीय संघटनेला महत्त्व देऊन कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांशी चर्चा करीत राहिले. यादरम्यान अनेकदा जयंत पाटील यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा झाल्या. अगदी अमुक दिवशी ते प्रवेश करतील, अशा तारखा सांगून झाल्या. परंतु प्रत्येक वेळी मी कुठेही जाणार नाही, असे जयंत पाटील सांगत राहिले. महत्त्वाचा मुद्दा असा की जर जयंत पाटील यांना सत्तेत जायचे असते तर सगळे नेते गेले तसे अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा मार्ग जयंत पाटील यांच्याकडे होता. शिवाय भाजप प्रवेशासाठी तर खुद्द राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी अनेकदा ऑफरही देऊन झाली आहे. मात्र सत्तेची छाया अनुभवली तशी विरोधी पखात राहून प्रखरताही अनुभवू, असे जयंत पाटील कार्यकर्त्यांना ऑन कॅमेरा सांगतात. अधून मधून महत्वाच्या प्रश्नांवर त्यांच्या खास शैलीत सौम्य पद्धतीने परंतु सत्ताधारी रक्तबंबाळ होतील, असे ओरखडेही काढतात. आजही वर्धापनदिनी करू नका चर्चा एवढ्यात पराभवाची, रणात झुंजणारे वीर आहेत अजून काही... असे सांगून येणाऱ्या काळातील आपले इरादे स्पष्ट केले. जयंत पाटील यांच्या प्रदेशाध्यक्षपदाचा लेखाजोखा लक्षात घेऊन शरद पवार तूर्त तरी त्यांच्याकडील पद काढणार नाहीत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका त्यांच्याच नेतृत्वात लढविणार आहोत, असे शरद पवार यांनी वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात सांगितले. याचाच अर्थ जयंत पाटील यांच्या नेतृत्वावर शरद पवार यांनी पुन्हा विश्वास दाखवला. दुसरीकडे रोहित पवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना जरा धीराने घेण्याचा सल्लाही शरद पवार यांनी दिल्याची चर्चा आहे.