राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा कार्यकर्ता महेंद्र घारे याने सोशल मीडियावर कमेंट लिहून हत्येचा इशारा दिला आहे. आता पुढचा नंबर भासेचा, अशा आशयाची कमेंट महेंद्र घारे यानं केली आहे. शिंदेसेनेच्या नेत्याला उघड धमकी देण्यात आल्याने शहरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
'पुढचा नंबर भासेचा'; सोशल मीडिया कमेंटने खळबळ
मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे कार्यकर्ते महेंद्र घारे यांनी सोशल मीडियावर एका पोस्टवर कमेंट करताना 'पुढचा नंबर भासेचा' असा धमकीवजा मजकूर लिहिला. ही कमेंट शिंदेसेनेचे नगरसेवक संकेत भासे यांच्या संदर्भात असल्याचे समोर आल्यानंतर कर्जतमध्ये खळबळ उडाली आहे. मंगेश काळोखे यांच्या हत्येच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारची धमकी आल्याने पोलीस प्रशासनही सतर्क झाले आहे.
advertisement
शिंदेसेनेची आक्रमक भूमिका
या धमकीनंतर शिंदेसेनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. नगरसेवक संकेत भासे आणि शिंदेसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी कर्जतचे उपविभागीय पोलीस अधिकारी आणि कर्जत पोलीस ठाण्यात लेखी निवेदन दिले आहे. महेंद्र घारे यांच्यावर तत्काळ कठोर कारवाई व्हावी. संबंधित व्यक्ती गुन्हेगारी पार्श्वभूमीची आहे, त्यांचा कसून तपास करावा. सोशल मीडियावरील त्या धमकीची सखोल चौकशी करून सूत्रधाराचा शोध घ्यावा, अशी मागणी शिवसेना शिंदे गटाने केली आहे.
मंगेश काळोखे यांच्या हत्येमुळे आधीच शहरात तणाव आहे. त्यातच आणखी एका लोकप्रतिनिधीला अशा प्रकारे सोशल मीडियावर धमकी दिल्याने राजकीय वर्तुळात तणाव निर्माण झाला आहे. आता पोलीस या प्रकरणाचा तपास करून आरोपी महेंद्र घारे याच्यावर काय कारवाई करतात, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
