याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, वन विभाग आणि कास समितीच्यावतीने 4 वाहनांची खरेदी करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. एका वाहनात 8 ते 10 प्रवासी बसू शकतात. या वाहनांच्या मदतीने राजमार्गावरील कार्यालय ते कुमुदिनीच्या फुलांसाठी प्रसिद्ध असलेल्या कुमुदिनी तलावापर्यंत पर्यटकांची ने-आण होणार आहे. कुमुदिनी तलाव हा मुख्य रस्त्यापासून तीन ते चार किलोमीटर दूर आहे. तिथे पर्यटकांना पायी चालत जावे लागते. एवढे अंतर चालत जावून माघारी येणे महिला, लहान मुलं आणि ज्येष्ठ पर्यटकांना कठीण जाते.
advertisement
राजमार्ग ते कुमुदिनी तलाव हा परिसर आतापर्यंत वाहनांपासून मुक्त ठेवण्यात आला आहे. त्यामुळे हा परिसर प्रदूषणमुक्त आहे. याच मार्गावर कास समितीच्यावतीने नुकतीच बैलगाडीची सफर सुरू करण्यात आली आहे. जांभ्या दगडाचा असणारा हा रस्ता कच्चा असून, या मार्गावर मजबूत वाहनांची गरज होती. याच मार्गावर आता इलेक्ट्रिक वाहनं धावणार आहेत.
कास पठारावर सध्या पिवळी, जांभळी, गुलाबी आणि निळी अशा विविध रंगांची फुले फुलली आहेत. यामध्ये करवी, सोनकी, टॉपली करवी, पांढरी बकुळी आणि अबोली अशा अनेक दुर्मीळ प्रजातींचा समावेश आहे. या पठारावर एकूण 850 पेक्षा जास्त वनस्पतींच्या प्रजाती आढळतात, त्यापैकी काही फक्त याच ठिकाणी पाहायला मिळतात. त्यामुळे हे पठार पर्यावरणप्रेमी आणि अभ्यासकांसाठी एक खास ठिकाण आहे.