पालघर जिल्ह्याच्या समुद्रकिनाऱ्यावर काल सापडलेले तीन मोठे कंटेनर ओमान येथे गेल्या महिन्यात दुर्घटनाग्रस्त झालेल्या जहाजाचे असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या महिन्यात ओमानमध्ये एक मालवाहू जहाज दुर्घटनाग्रस्त झाले होते, ज्यात साडेतीनशे कंटेनर होते. त्यापैकी 302 कंटेनर शोधण्यात ओमानला यश आले होते.
advertisement
या दुर्घटनेनंतर बेपत्ता असलेल्या 48 कंटेनरपैकी 25 कंटेनर गुजरातच्या किनाऱ्यावर तर तीन कंटेनर पालघरच्या समुद्रकिनाऱ्यावर पोहोचले असल्याची माहिती पालघर पोलिसांनी दिली आहे. हे कंटेनर ऑइलची वाहतूक करणाऱ्या जहाजाचे होते. जहाज दुर्घटनाग्रस्त झाल्यानंतर कंटेनर देखील समुद्रात विखुरले गेले. त्यातील काही कंटेनर अद्यापही सापडले नाहीत.
या कंटेनरमधील ऑइल मानवी शरीरासाठी धोकादायक नसले तरी, ते समुद्रात पसरल्यास माशांसाठी धोकादायक ठरू शकते. त्यामुळे खबरदारीच्या उपाययोजना केल्या जात आहेत. या कंटेनरमुळे स्थानिक मच्छिमारांमध्ये भीतीचे वातावरण आहे, मात्र पोलीस आणि प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगितले आहे.