डॉक्टरच्या आत्महत्येमागे पीएसआय गोपाल बदणे आणि प्रशांत बनकर या दोघांचा हात असल्याचा उल्लेख डॉक्टरने आपल्या सुसाईड नोटमध्ये केला होता. महिला डॉक्टरने आपल्या तळहातावर सुसाईड नोट लिहून जीवन संपवलं होतं. पीएसआय बदणे याने आपल्यावर चार वेळा लैंगिक अत्याचार केला. तर प्रशांत बनकरने मानसिक आणि शारीरिक त्रास दिल्याचं तिने नोटमध्ये लिहिलं होतं. आता पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे. दोघांची कसून चौकशी सुरू आहे. मात्र, तपासादरम्यान पीएसआय गोपाल बदणे याने अत्यंत महत्त्वाचा पुरावा असलेला त्याचा मोबाईल लपवल्याची माहिती समोर आली आहे.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी पीएसआय बदणे याने पोलीस ठाण्यात सरेंडर करण्यापूर्वीच आपला मोबाईल फोन लपवला आहे. हा मोबाईल कुठे आहे, याची माहिती तो पोलिसांना देत नाहीये. हा मोबाईल या प्रकरणातील अत्यंत महत्त्वाचा पुरावा असल्याने आता पोलीस युद्धपातळीवर या मोबाईलचा शोध घेत आहेत.
या आत्महत्येपूर्वी, दोन्ही आरोपी महिला डॉक्टरच्या संपर्कात होते, याची कबुली पीएसआय बदणे याने पोलिसांना दिली. तसेच, आत्महत्या करण्यापूर्वी आरोपी बदणे याचं दुसरा आरोपी प्रशांत बनकर याचं व्हॉट्सअॅप कॉलवरून बोलणं झाल्याची माहिती समोर आली होती. आता त्यांच्यात नेमकं काय बोलणं झालं? याचा खुलासा होऊ शकला नाही. यासाठी बदणेचा मोबाइल अत्यंत महत्त्वाचा पुरावा होता.
या सर्व संभाषणाचे आणि संपर्काचे डिटेल्स आरोपीच्या मोबाईलमध्ये उपलब्ध असण्याची दाट शक्यता आहे. परंतु, बदणेने जाणूनबुजून मोबाईल लपवल्यामुळे नेमके काय संभाषण झाले, आत्महत्येला प्रवृत्त करण्यामागे कोणते कारण होते, हे समोर आणण्यात पोलिसांना अडचणी येत आहेत. पीएसआय बदणेचा मोबाईल जप्त करणे, आता पोलिसांसाठी सर्वात मोठे आव्हान ठरत आहे.
