विद्यमान आमदार, मंत्री आणि खासदारांच्या मुलांना महापालिका निवडणुकीत तिकीट न देण्याचा आदेश भाजपच्या वरिष्ठांनी काढला. त्यानंतर पुण्यासह राज्यातील अनेक आमदार खासदार आणि मंत्र्यांची निराशा झालेली पाहायला मिळाली. विद्यमान मंत्र्यांनी आणि आमदारांनी आपल्या घरातले नातेवाईकांसाठी महापालिका निवडणुकीचे तिकीट मिळावे म्हणून भाजपात जबरी फिल्डिंग लावली होती, पण वरिष्ठांच्या आदेशानंतर या सगळ्यांच्या इच्छा अपेक्षा धुळीत मिळाल्या. मात्र याला अपवाद ठरले ते पुण्यातील वडगाव शेरीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार बापू पठारे!
advertisement
राष्ट्रवादीच्या आमदाराच्या घरात भाजपची तीन तिकीटे
बापू पठारे यांच्या घरात भाजपकडून तिघांना उमेदवारी मिळाली आहे. बापू पठारे यांचे पुत्र सुरेंद्र पठारे, त्यांची सून ऐश्वर्या पठारे तर बापू पठारे यांची भाची या तिघांना भाजपने पुणे महानगरपालिकेसाठी उमेदवारी दिली आहे. काही दिवसांपूर्वीच आमदार बापू पठारे यांचे पुत्र सुरेंद्र पठारे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्याच वेळेस सुरेंद्र पठारे यांना भाजपकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरवले जाणार हे स्पष्ट झाले होते.
मात्र आज ज्यावेळेस उमेदवारी अर्ज दाखल झाले त्यावेळेस केवळ सुरेंद्र पठारेच नाही, तर बापू पठारे यांची सून आणि भाचीने देखील उमेदवारी अर्ज दाखल केला. एकूणच काय तर पुण्यातल्या राष्ट्रवादी शरदचंद्र काँग्रेस पक्षाच्या आमदाराने अशी फिल्डिंग लावली की भाजपने काढलेला तो आदेश देखील चालला नाही!
आमदार पठारे यांच्या प्रभागातून तुतारी गायब
ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने बापूसाहेब पठारे यांना आमदार केले, त्या पक्षाची 'तुतारी वाजवणारा माणूस' ही निशाणी प्रभागातून गायब करण्याचे विशेष काम त्यांनी केले. तिकीटासाठी स्वत:च्या नातेवाईंना भाजपमध्ये पाठवल्याने बापूसाहेब पठारे यांच्यावर बरीच टीका होत आहे.
