उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या काही मिनिटांमध्ये पुण्याच्या धनकवडी-सहकारनगर भागामध्ये इच्छुक उमेदवाराने थेट एबी फॉर्मच खाऊन टाकला. प्रभाग क्रमांक 36 अ मध्ये शिवसेनेच्या दोन इच्छुक उमेदवारांमध्ये वाद झाला. हा वाद इतका वाढला की एका इच्छुकाने उमेदवाराचा एबी फॉर्म हिसकावला आणि गिळून टाकला, त्यामुळे निवडणूक केंद्रात एकच खळबळ माजली.
प्रभाग क्रमांक 36 अ मधून शिवसेनेकडून मच्छिंद्र ढवळे आणि उद्धव कांबळे यांना एबी फॉर्म दिले गेले, त्यामुळे बुधवारी निवडणूक केंद्रामध्ये दोघांमध्ये वादाला सुरूवात झाली. या वादावादीने अखेर टोक गाठलं आणि उद्धव कांबळे यांनी मच्छिंद्र ढवळे यांच्या हातातील शिवसेनेचा अधिकृत एबी फॉर्म हिसकावला आणि फाडला. उद्धव कांबळे एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी हा फाटलेला एबी फॉर्म खाऊन टाकला.
advertisement
अर्ज दाखल करायला काही मिनिटं शिल्लक असताना घडलेल्या या घटनेमुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्ये तणाव निर्माण झाला. अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली. निवडणूक प्रक्रियेत गोंधळ घातल्याप्रकरणी आणि सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी उद्धव कांबळे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.
उद्धव कांबळेंना पोलिसांनी ताब्यात घेतलं असलं तरी मच्छिंद्र ढवळे यांच्या उमेदवारीचं काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. मच्छिंद्र ढवळे यांचा उमेदवारी अर्ज वैध ठरणार का अवैध? याबाबत सस्पेन्स निर्माण झाला आहे. पुण्यामध्ये प्रभाग क्रमांक 3 मध्येही एबी फॉर्मवरून वाद निर्माण झाला होता. शिवसेनेच्या इच्छुक उमेदवार पद्मा शेळके यांनी पक्षाने आपल्याला अधिकृत एबी फॉर्म दिला, पण अज्ञात व्यक्तीने हा एबी फॉर्म पळवला, असा आरोप केला.
