समोर आलेल्या माहितीनुसार, संबंधित शिवशाही बस पुण्याहून सोलापूरकडे नियमित फेरीसाठी निघाली होती. प्रवाशांना घेऊन जात असताना दौंड तालुक्यातील खडकी गावच्या हद्दीत अचानक एका चारचाकी वाहनाने बससमोर आडवी गाडी लावून बस थांबवण्यात आली. यानंतर चार ते पाच जणांनी बसमध्ये घुसून चालकाला जबरदस्तीने बाहेर ओढले आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली.
मारहाणीचे कारण अद्याप स्पष्ट नाही
advertisement
अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे बसमधील प्रवासी प्रचंड घाबरले. काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मारहाणीत चालकाच्या डोक्याला, हातापायांना गंभीर दुखापत झाली असून, त्यांना तत्काळ नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सुदैवाने या घटनेत इतर कोणत्याही प्रवाशाला इजा झालेली नाही. मारहाणीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. किरकोळ वादातून ही घटना घडल्याची प्राथमिक शक्यता वर्तवली जात आहे.
आरोपींची ओळख पटवण्याचे काम सुरू
घटनेनंतर आरोपी चारचाकी वाहनातून घटनास्थळावरून पसार झाले. घटनेची माहिती मिळताच दौंड पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि पंचनामा करून तपासाला सुरुवात केली. या प्रकरणी बस चालकाच्या फिर्यादीवरून दौंड पोलीस ठाण्यात चार ते पाच अज्ञात व्यक्तींविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपींची ओळख पटवण्याचे काम सुरू सुरू आहे.
कर्मचाऱ्यांवरील वाढत्या हल्ल्यांंमुळे तीव्र संताप
दरम्यान, सार्वजनिक वाहतूक सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांवरील वाढत्या हल्ल्यांच्या घटनांमुळे चालक व वाहकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात असून, त्यांच्या सुरक्षिततेसाठी कडक उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.
