मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलींचे आई-वडील विभक्त झाले आहेत. यामुळे या चारही मुलींचा सांभाळ दूरचे नातेवाईक करत होते. सांभाळ करण्यासाठी दिलेल्या पालनकर्त्यानेच चार सख्ख्या बहिणींवर लैंगिक अत्याचार केला आहे. या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या संदर्भात पती पत्नीला अटक करण्यात आली असून, त्यांना आज न्यायालयापुढे हजर केले जाणार असल्याची माहिती राहुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय ठेंगे यांनी दिली.
advertisement
हे प्रकरण स्नेहालय संचालित 'उडान' प्रकल्पाच्या कार्यकर्त्यांनी उघडकीस आणले. या कार्यकर्त्यांनी राहुरी पोलिसांचे लक्ष वेधल्यानंतर पोलीस निरीक्षक ठेंगे यांनी तातडीने हालचाल करत चौघींची मुक्तता केली व दोघांना अटक केली.
राहुरी तालुक्यात घडलेल्या या खळबळजनक घटनेतील चौघी पीडित मुली एकाच कुटुंबातील असून त्या सर्वजणी नाशिक जिल्ह्यातील आहेत. त्यातील एक मुलगी सज्ञान तर इतर ३ मुली अल्पवयीन आहेत. सज्ञान झालेल्या मुलीचा चार महिन्यांपूर्वी विवाह झाला. नराधम आरोपीने तिच्यावर अनेकदा लैंगिक अत्याचार केला. अलीकडेच ती बहिणींना भेटण्यासाठी राहुरी तालुक्यात आली होती. यावेळी आरोपीनं पुन्हा तिला आपल्या वासनेचा शिकार बनवलं. यानंतर पीडितेनं तिच्यावर झालेल्या अत्याचाराची माहिती आपल्या पतीला दिली.
यानंतर दोघांनी स्नेहालय संस्थेच्या उडान प्रकल्पाच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधला. त्यानंतर या प्रकरणाला वाचा फुटली. आरोपीनं केवळ या सज्ञान मुलीवरच नव्हे तर तिच्या इतर तीन बहिणींवर देखील अनेकदा लैंगिक अत्याचार केल्याचं समोर आलं आहे. पीडित अल्पवयीन मुलींमध्ये एक मुलगी १६, दुसरी १४ व तिसरी १० वर्षांची आहे. या प्रकरणी पोलिसांनी पालनकर्त्या जोडप्यावर गुन्हा दाखल करत दोघांना अटक केली आहे.