रायगडमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका कार्यक्रमाच्या बॅनरवरून अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांचे फोटो गायब झाल्याचे समोर आले आहे. विलिनीकरण आणि पक्ष ताब्यात घेण्याच्या कथित मुद्द्यावरून आधीच सुनील तटकरे हे राष्ट्रवादीच्या काही पदाधिकाऱ्यांच्या निशाण्यावर होते. त्यात आता बॅनरवर अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांचे फोटो नसल्याच्या मुद्द्यावरून तटकरे यांच्यावर जोरदार टीका होत आहे.
advertisement
मालकाला बाजूला सारून... रोहित पवार काय म्हणाले?
'मालकाला अलगद बाजूला सारून जेव्हा बटाईदारच जमिनीचा सातबारा स्वतःच्या नावे करतो, याचे जिवंत उदाहरण.. जे आम्ही वारंवार बोलतोय', अशा शब्दात रोहित पवार यांनी सुनील तटकरे यांच्यावर बोचरा हल्ला चढवला. सुनील तटकरे हे पक्ष ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचा पुनरूच्चार त्यांनी पुन्हा एकदा केला. गेल्या अनेक दिवसांपासून सुनील तटकरे हे रोहित पवार यांच्या निशाण्यावर आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा ताबा मिळविण्यासाठी तटकरे प्रयत्न करीत असल्याचा गंभीर आरोप रोहित पवार यांनी अनेकदा केला आहे.
अमोल मिटकरी यांचाही तटकरेंवर निशाणा
ज्यांच्या नेतृत्वावर कार्यकर्त्यांचा विश्वास आहे, त्यांचाच फोटो हटवला जातोय, हे राष्ट्रवादीचा सर्वसामान्य कार्यकर्ता कधीही सहन करणार नाही, असा इशारा देत राष्ट्रवादीच्या दैवतांना डावलून स्वत: देव बनण्याचा कुणीही प्रयत्न करू नये. महाराष्ट्र हे सहन करणार नाही, अशा शब्दात अमोल मिटकरी यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. या पोस्टमध्ये त्यांनी तटकरे यांचे नाव घेण्याचे टाळले असले तरी त्यांचा रोख तटकरे यांच्याकडेच असल्याचे स्पष्ट होते.
अजितदादा-सुनेत्रा पवारांचा फोटो बॅनरवरून कसा गायब झाला? रायगडमध्ये काय घडलं?
मंत्री आदिती तटकरे यांच्या मतदारसंघातील इंदापुर येथे माणगांव तालुक्यातील नवनिर्वाचित जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. यावेळी व्यासपीठावरील बॅनरवर खासदार सुनील तटकरे, मंत्री आदिती तटकरे, माजी आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह स्थानिक नेत्यांचे फोटो लावण्यात आले. मात्र या बॅनरवर दिवंगत नेते अजित पवार, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह पक्षश्रेष्ठींचे फोटो लावण्यात आले नव्हते. रायगडमध्ये राष्ट्रवादीच्या बॅनरवरून पक्षश्रेष्ठींचाच फोटो नसल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.
