नागपूर : नागपूरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नागपुरातील एम्स वैद्यकीय महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या विद्यार्थिनीने फ्लॅटमध्ये गळफास घेऊन जीवन यात्रा संपवली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समृध्दी पांडे असं या विद्यार्थिनीचं नाव आहे. मृतक समृद्धीचे वडिल हे केंद्रीय राखीव पोलीस दलाचे पुणे येथील उपमहानिरीक्षक आणि आयपीएस अधिकारी कृष्णकांत पांडे आहेत. समृद्धी कृष्णकांत पांडे ही एम्स नागपूर इथं एमडी डर्माटोलॉजीची प्रथम वर्षाची विद्यार्थिनी होती. ती सोनेगाव परिसरातील शिव कैलास सोसायटीतील मंजिरा अपार्टमेंटमध्ये राहत होती.
advertisement
समृध्दीच्या वडिलांनी तिच्याशीच फोनवरून संपर्क साधला असता ती फोन उचलत नसल्याचं लक्षात आलं. त्यानंतर त्यांनी तिच्या मैत्रिणीला फोन लावून विचारणा केली असता, 'ती रूमवर आहे' असं तिच्या मैत्रिणीनं सांगितलं. त्यानंतर कृष्णकांत पांडे यांनी समृद्धीच्या मैत्रिणीला 'रूमवर जाऊन बघं ती फोन का उचलत नाही आहे' असं सांगितलं. त्यानंतर तिची मैत्रीण रूमवर गेली असता तिच्या समोर समृद्धीने ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं आढळून आलं.
तिने लगेच ही माहिती तिच्या वडिलांना दिली आणि पोलिसांना कळवलं. घटनेची माहिती मिळताच सोनेगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा केला आणि समृद्धीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला आहे.
या प्रकरणात नागपूर एम्सकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार आला आहे. या सोबतच वरिष्ठ सुत्रांकडून माहिती समोर येत आहे की, मृत विद्यार्थिनीला एम्समध्ये दाखल होऊन फक्त दोन ते तीन महिने झाले होते. समृद्धी डर्माटोलॉजी शाखेची विद्यार्थिनी असल्याने अकॅडमिक स्ट्रेस असण्याचा प्रश्नच नाही. या शाखेत सकाळी 9 ते संध्याकाळी 5 एवढेच काम असतं. त्यामुळे अतिरिक्त ताण किंवा रात्री उशिरापर्यंत काम करण्याची आवश्यकता नसते. एम्स नागपूरमध्ये विद्यार्थ्यांसाठी नियमित काऊन्सिलिंग सेवा, तणावमुक्ती कार्यशाळा आणि मानसिक आरोग्यासाठी विविध सुविधा उपलब्ध असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
पोलिसांनी तिच्या मैत्रिणींकडे विचारपूस केली. समृद्धी ही छोट्या छोट्या कारणांवरून तणाव घेत असे. तिला अभ्यासाचा तणाव असल्यामुळे तिने हे कृत्य केलं असू शकतं, अशी माहिती सोनेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन मगर यांनी दिली. या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत आहे.
