साताऱ्याच्या जिल्हा परिषदेच्या सत्तेसाठी राष्ट्रवादी आणि शिवसेना यांची एकत्रितपणे बैठक पार पडली होती. त्यानंतर आज जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री शंभूराज देसाई आणि मंत्री शिवेंद्रराजे भोसले जिल्हाधिकारी कार्यालयात एकत्र आले होते. बैठकीनंतर मंत्री शिवेंद्रराजे यांना जिल्हा परिषदच्या सत्ता स्थापनेबद्दल प्रश्न विचारल्यावर त्यांनी टोलेबाजी केली.
भाजपवर रागावलेल्या शंभूराज देसाईंना शिवेंद्रराजे म्हणाले...
advertisement
मंत्री शंभूराज देसाई जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, त्यांच्या पालकत्वाखाली आम्ही आहोत. हात काय आम्ही मिठी मारायला देखील तयार आहोत, मात्र त्यांना ते चालतंय का बघा...! अशी मिश्किल कोपरखळी मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मारली. शेजारी उभे असणाऱ्या मंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे इशारा करत त्यांनी "मला बोलावले आणि मी गेलो नाही असं कधी झालं नाही. फक्त या आधी मला थेट निरोप मिळाला नव्हता", अशी टोलेबाजी केली.
पालकमंत्री मोठे आहेत, त्यांनी सामावून घ्यावे
जिल्हा परिषदेत तुम्ही दोघे एकत्र येणार का ?असा सवाल पत्रकारांनी विचारल्यावर भाजपकडे संख्याबळ जरी जास्त असले तरी पालकमंत्री मोठे आहेत आणि मोठ्यांनी सामावून घेतले पाहिजे, असे शिवेंद्रराजे म्हणाले. तसेच दोन बैठकांना बोलावून देखील तुम्ही आला नाही असे विचारल्यावर, त्यावेळी वातावरण ठीक नव्हते मात्र आता चांगले झाले आहे, असे शिवेंद्रराजे म्हणाले. त्यावर देसाई खळखळून हसले.
शंभूराज देसाई यांचा भाजपवर राग
अति तिथे माती! कुठे जाऊन काही अति केले तर माणसे सुद्धा योग्य संधी आणि योग्य वेळेची वाट पाहत असतात, अशा शब्दात मंत्री शंभूराज देसाई यांनी भारतीय जनता पक्षावर टीका केली होती. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत पाटणमध्ये जाऊन भाजप नेत्यांनी शंभूराज देसाई यांना वैयक्तिक लक्ष्य केले होते. मात्र पाटणकरांनी देसाई यांचे नेतृत्व प्रमाण मानून शिवसेनेला मते दिली. भाजपच्या पराभवानंतर देसाई यांनीही नेत्यांना सुनावत आपली नाराजी व्यक्त केली.
सातारा जिल्हा परिषदेचे पक्षीय बलाबल काय?
सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेलं नाही. जिल्हा परिषदेचा निकाल हा त्रिशंकू लागलेला आहे.
एकूण जागा- 65
भाजप - 23
राष्ट्रवादी - 22
शिवसेना - 13
काँग्रेस : 1
इतर- 2
