ही घटना बेलतरोडी परिसरातील सिंगापूर सिटी भागात घडली. पीडित बालिका मजुरी करणाऱ्या कुटुंबातील आहे. रोजंदारीवर काम करणाऱ्या या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. चिमुकलीसोबत घडलेला हा अमानुष प्रकार समजताच परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, पोलिसांनी संशयित आरोपीला अटक केली आहे. तो या परिसरात सिक्युरिटी गार्ड म्हणून कार्यरत होता. याशिवाय आरोपी मानसिक आजाराने त्रस्त असून तो नियमित औषधे घेत असल्याचा दावा त्याच्या बहिणीने केला आहे. मात्र हा मुद्दा पोलिस तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.
advertisement
पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
सध्या पीडित बालिकेवर नागपूरमधील सरकारी रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. घटनेची गंभीरता लक्षात घेता वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. बालिकेच्या पालकांचे जबाब घेण्यात आले असून, आरोपीविरुद्ध पॉक्सो कायद्यांतर्गत तसेच बलात्काराच्या गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यात येत असून, आरोपीच्या मानसिक स्थितीची तपासणीसाठी वैद्यकीय चाचणी केली जाणार असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. कडक कारवाईची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
अवघ्या पाच वर्षांच्या निरागस चिमुकलीवर झालेल्या या अमानुष कृत्याने पुन्हा एकदा मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. समाजातील विकृत मानसिकतेमुळे बालिकांवर होत असलेल्या अत्याचारांच्या घटना वाढत असल्याचे चित्र आहे. या घटनेने नागपूरकर संतप्त झाले असून, आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी होत आहे.