ठाकरे गटाचे अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेते पक्षाला रामराम ठोकून सत्ताधारी महायुतीच्या घटक पक्षांत प्रवेश करत आहेत. आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. विदर्भात ठाकरे गटाला मोठं खिंडार पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी मुंबईत नागपूर शहरातील पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवली होती. या बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा होणार होती. पण या बैठकीला नागपूर शहरातील दोन्ही जिल्हाप्रमुखांची दांडी मारल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईत बोलवलेल्या बैठकीला अशाप्रकारे दोन्ही जिल्हाप्रमुख अनुपस्थित राहिल्याने विविध चर्चांना उधाण आलं आहे.
advertisement
या बैठकीच्या निमित्ताने ठाकरे गटामधील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आला आहे. नागपूरचे जिल्हाप्रमुख किशोर कुमेरिया प्रकृतीच्या कारणास्तव बैठकीला गैरहजर राहिल्याची माहिती आहे. तर दुसरे जिल्हाप्रमुख प्रमोद मानमोडे कामात व्यग्र असल्याने उपस्थित राहिले नसल्याचं समजत आहे. या बैठकीत संपर्कप्रमुख सतीश हरडे यांनी भूमिका मांडली. पण विदर्भाचं प्रमुख सत्ताकेंद्र असलेल्या नागपूरचे दोन्ही जिल्हा प्रमुख ठाकरेंच्या बैठकीला न आल्याने विविध चर्चांना उधाण आलं असून मोठं खिंडार पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नागपूरमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक आघाडी करून लढायची की स्वबळावर? यासंदर्भात स्थानिक नेत्यांनी निर्णय घ्यावा, अशा सूचना उद्धव ठाकरेंनी या बैठकीत दिल्याची माहिती आहे.