राज्यातील पालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सगळेच राजकीय पक्ष जोरदार तयारी करतायेत. सत्ताधारी पक्षांमध्ये जोरदार स्पर्धा असून एकमेकांच्या पक्षातील नेत्यांना पक्षप्रवेश देण्याची चढाओढ लागली आहे. स्थानिक समीकरणे लक्षात घेऊन आपलाच वरचष्मा राहील याचा प्रयत्न सुरू आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रकाश चित्ते यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला. ठाणे येथील स्व. गंगुबाई शिंदे सभागृहात पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम संपन्न झाला. जिल्ह्यातील भाजप अंतर्गत कुरघोडीच्या राजकारणानंतर प्रकाश चित्ते यांनी मोठा निर्णय घेतला. भाजपचे माजी नगरसेवक किरण लुनीया, संजय पांडे, बबन मुठे, सोमनाथ कदम आदींसह २०० कार्यकर्त्यांनी धनुष्यबाण हाती घेतले.
advertisement
नाशिकच्या पदाधिकाऱ्यांचा शिंदेसेनेत प्रवेश
नाशिक जिल्ह्यातील देवळाली प्रवरा नगर परिषदेचे माजी नगरसेवक शिवाजीराव मुसमाडे, त्यांचे पुत्र प्रशांत मुसमाडे, काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष प्रमोद मुसमाडे, उबाठा गटाचे माजी नगरसेवक तुषार शेटे, माजी नगरसेवक अनिल शेंडगे, माजी उपनगराध्यक्ष ऍड.अजय पगारे यांनीही आज भगवा झेंडा हाती घेत शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला.
नगरमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादीलाही धक्का
अहिल्यानगर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या महाराष्ट्र प्रदेश सचिव रेश्माताई माणिक जगताप, विद्या कांबळे, संगीता जगताप, रंजना जाधव, विशाखा दुर्गे, सविताताई पठारे यांनीही हाती भगवा झेंडा घेत शिवसेनेत प्रवेश केला.