नेमकं प्रकरण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी आणि आरोपी तरुणी या अभियांत्रिकीच्या तिसऱ्या वर्षात शिकत असून गेल्या तीन वर्षांपासून एकाच खोलीत राहत होत्या. १९ जानेवारी रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास आरोपी तरुणी आपल्या प्रियकराशी फोनवर बोलत होती. यावेळी ती, "कसे वाटले फोटो आणि व्हिडिओ? हॉट आहेत का?" असे विचारत असताना पीडितेनं तिचा संवाद ऐकला. संशय आल्याने पीडितेने तिचा मोबाईल हिसकावून तपासला असता हा धक्कादायक प्रकार समोर आला.
advertisement
स्नॅपचॅटचा वापर करून पाठवले व्हिडिओ
पीडितेने आरोपीचा मोबाईल तपासला असता, १८ जानेवारी रोजी ती खोलीत कपडे बदलत असतानाचे चोरून केलेले चित्रीकरण आढळले. हे अश्लील फोटो आणि व्हिडिओ आरोपी तरुणीने तिचा प्रियकर स्वराज धालगडे याला स्नॅपचॅटवर पाठवले होते. विश्वासू मैत्रिणीनेच असा विश्वासघात केल्याने पीडितेला मोठा मानसिक धक्का बसला आहे. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर आरोपी तरुणीने सुरुवातीला माफी मागितली. मात्र, पीडितेने पोलिसांत जाण्याचा पवित्रा घेताच तिने कांगावा सुरू केला. "जर तू तक्रार केलीस, तर मी माझ्या जिवाचे बरे-वाईट करून घेईन आणि त्याला तूच जबाबदार असशील," अशी धमकी देत पीडितेवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला.
पीडितेचे धाडस आणि पोलीस कारवाई
आरोपी तरुणीच्या धमक्यांना न जुमानता पीडित तरुणीने वसतिगृहाच्या वॉर्डन आणि आपल्या पालकांना हा प्रकार सांगितला. पालकांच्या पाठिंब्यानंतर सिडको पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी आरोपी तरुणी आणि तिचा प्रियकर स्वराज धालगडे याच्याविरुद्ध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. एका उच्चशिक्षित तरुणीनेच असा प्रकार केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
