संभाजी शिवाजी दोलतोडे असं मृत पावलेल्या पोलिसाचं नाव आहे. ते सोलापूर शहर पोलीस दलात कार्यरत होते. सोमवारी पहाटे बेडवरून पडून त्यांचा मृत्यू झाला आहे. बेडवरून पडल्यानंतर त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्यामुळे त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मयत दोलतोडे हे सोलापूर शहरातील वाहतूक शाखेत कार्यरत होते.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसर, शिवाजी दोलतोडे हे रविवारी रात्री आपल्या घरी बेडवर झोपले होते. पहाटे गाढ झोपेत कूस बदलण्याचा प्रयत्न करत असताना ते बेडवरून खाली पडले. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तसेच यानंतर त्यांना उलटी देखील झाल्याची माहिती आहे. ही घटना घडताच दोलतोडे यांच्या पत्नीने त्यांना तातडीने सोलापुरातील खासगी रुग्णालयात दाखल केलं. पण तोपर्यंत फार उशीर झाला होता. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.
संभाजी दोलतोडे हे मूळचे माढा तालुक्यातील उपळाई खुर्द गावचे रहिवासी होते. ते सोलापूरात आपल्या कुटुंबासह राहत होते. तसेच ते गोळा फेक आणि थाळी फेक या खेळात अग्रेसर होते. अशा धडधाकट पोलिसाचा बेडवरून पडून मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. संभाजी दोलतोडे यांना पत्नी, एक दीड वर्षाची मुलगी आणि सहा वर्षांचा मुलगा असा परिवार आहे.