प्रशासनाने केलेली कारवाई योग्य
या घटनेनंतर, सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांनी कुर्डूतील मुरूम उपसा बेकायदेशीर असल्याचा निर्वाळा दिला. त्यामुळे अंजना कृष्णा आणि महसूल प्रशासनाने केलेली कारवाई योग्य असल्याचे सिद्ध झाले. यामुळे अजित पवार यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणी कुर्डू गावचे सरपंच कुंताबाई चोपडे आणि ग्रामसेवक मोहन पवार यांच्या विरोधात मुरूम चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गावातील तलाठी प्रिती शिंदे यांनी यासंदर्भात कुर्डूवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सरपंच आणि ग्रामसेवकांनी संगनमत करून अवैध मुरूम उपसा केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.
advertisement
नेमकं प्रकरण काय?
माढा तालुक्यातील कुर्डू गावामध्ये अवैधरीत्या मुरूम उपसा सुरू होता. याची माहिती मिळाल्यानंतर आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा कारवाई करण्यासाठी घटनास्थळी गेल्या. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे माढा तालुका युवक अध्यक्ष बाबाराजे जगताप यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फोन लावला आणि तो फोन अंजना कृष्णा यांच्या हातात दिला. या फोन कॉलमध्ये अजित पवारांनी अंजना कृष्णा यांना कारवाई थांबवण्याचे निर्देश दिले, असे म्हटले जाते. हे संपूर्ण संभाषण कॅमेऱ्यात कैद झाले आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला, ज्यामुळे मोठा वाद निर्माण झाला.
महसूल अधिकाऱ्यांना मारहाण
दरम्यान, अंजना कृष्णा यांच्या कारवाईनंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा महसूल अधिकारी पुन्हा कारवाईसाठी गावात गेले, तेव्हा त्यांना गावकऱ्यांनी मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये काही गावकऱ्यांच्या हातात बेसबॉल स्टिक दिसत आहेत. त्यामुळे या प्रकरणाला आता राजकीय आणि गुन्हेगारी वळण मिळाल्याचं पहायला मिळतंय.