प्रेषित मोहम्मद पैगंबरांच्या 1500 व्या जयंतीनिमित्त सोलापूर शहरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. काही लोकांनी गणेशोत्सवाप्रमाणे देखावे देखील तयार केले होते. शहरातील एम.एस. ग्रुपच्यावतीने मुंबई येथील हाजी अली दर्ग्याचा देखावा तयार करण्यात आला होता. हा देखावा तयार करण्यासाठी दोन महिन्याचा कालावधी लागला. थर्माकॉल, काच आणि पाण्याचा वापर करून हा हुबेहूब देखावा तयार करण्यात आला आहे. एम. एस. ग्रुपच्या 200 कार्यकर्त्यांनी हा देखावा तयार करण्यासाठी परिश्रम घेतले.
advertisement
एम. एस. ग्रुप गेल्या पाच वर्षांपासून, प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीच्या दिवशी विविध देखावे तयार करत आहे. प्रेषित पैगंबर यांच्या जयंतीच्या दिवशी मुलांना खाऊ वाटप तसेच 60 लिटर दुधापासून तयार करण्यात आलेल्या रबडी खीरीचं वाटप करण्यात आलं. हाजी अली दर्ग्याचा देखावा बघण्यासाठी सोलापूरकर गर्दी करत आहेत.
सोलापूरमध्ये मोठ्या प्रमाणात मुस्लिम धर्मीय वास्तव्य करतात. दरवर्षी ते आपले सण मोठ्या उत्साहात साजरे करतात. गेल्या काही वर्षांपासून ईद-ए-मिलादनिमित्त देखावे उभारण्याची पद्धत शहरातील मुस्लिम बांधवांनी सुरू केली आहे.