श्रीक्षेत्र पंढरपूर येथील संत नामदेव महाराज जन्मस्थान वाडामधील श्री केशवराज मंदिरात उपमुख्यमंत्री शिंदे यांचा आज संतशिरोमणी श्री संत नामदेव महाराज पुरस्काराने सन्मान करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. या सोहळ्याला आमदार समाधान अवताडे, आमदार अभिजित पाटील, गुरुमहाराज चैतन्यस्वामी देगलूरकर, निवृत्ती महाराज, शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेनेचे अक्षय महाराज भोसले, भक्तशिरोमणी संत श्री नामदेवमहाराजांचे वंशज आणि परिवार सदस्य, वारकरी संप्रदायातले प्रमुख कीर्तनकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
advertisement
Accident: हेच खरे देवदूत! दुचाकी अपघातात दोघे जण गंभीर जखमी, वायुवेग पथकाने वाचवले प्राण
उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, यापूर्वी अनेकवेळा मी पंढरपुरात येऊन गेलो, पण आजचे वातावरण बघून मन भरून गेले. संत नामदेव महाराजांच्या जन्मस्थानी हा सोहळा होतोय, या वाड्यात अनेक संतांचे वास्तव्य होते. प्रत्यक्ष पांडुरंगाने इथं सेवा केली. त्यामुळे इथं पुरस्कार मिळणं हे मोठं भाग्य समजतो. हे स्थान म्हणजे वारकऱ्यांचे चालते बोलते विद्यापीठ आहे. नामदेव महाराजांच्या नावे हा पुरस्कार म्हणजे कृतार्थ होण्याचा आणि नतमस्तक होण्याचा आजचा क्षण आहे, असे ते म्हणाले.
मला काय मिळालं यापेक्षा समाजाला काय देणं लागतो ही भावना ठेवून आजवर काम केले. हा पुरस्कार माझ्या सर्व सहकाऱ्यांचा, माझ्यावर प्रेम करणाऱ्या लाडक्या बहिणींचा, लाडक्या भावांचा, लाडक्या शेतकऱ्यांचा पुरस्कार असल्याची भावना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केली.
हा पुरस्कार कोणत्याही पदापेक्षा सगळ्यात मोठा पुरस्कार आहे. संत सज्जनांनी आणि लाखो वारकऱ्यांनी दिलेला हा पुरस्कार रुपी आशीर्वाद आहे. मुख्यमंत्री असताना कॉमन मॅन म्हणून काम केलं आता डीसीएम अर्थात डेडिकेटेड टू कॉमन मॅन म्हणून काम करतोय, असे ते म्हणाले. बाळासाहेब, दिघे साहेब सांगायचे संत सेवा, जनसेवा हीच ईश्वर सेवा आहे आणि त्याच मार्गाने आपण पुढे जातोय, असे ते म्हणाले.
नामदेव महाराजांनी भागवत धर्माची पताका देशभर नेली आणि तिथं रुजवली, वाढवली. वारकऱ्यांना प्रतिष्ठा मिळवून देणारे नामदेव महाराज केवळ महाराष्ट्राचेच नाही तर अखिल विश्वाचे संत होते. नामदेव महाराज जितके मराठी माणसांचे आहेत तितकेच ते शिखांचे देखील आहेत. कीर्तन कलेतून प्रत्यक्ष पांडुरंग डोलायचे, अशी नामदेव महाराजांची कीर्ती होती. त्यांनी निष्ठेने वारकरी पंथांचा प्रसार केला. बहुजन समाजाच्या सुप्त आकांक्षा जागवल्या.
साधुसंतांच्या चरणांच्या धुळीचा स्पर्श व्हावा म्हणून पंढरपुरात विठ्ठल मंदिरात महाद्वारी पायरीचा दगड होण्यात त्यांनी धन्यता मानली. कुत्र्याने भाकर पळवली तर त्याला ती कोरडी खायला लागू नये म्हणून तुपाची वाटी घेऊन पळणाऱ्या नामदेव महाराजांच्या ठायी प्रचंड माणुसकी आणि भूतदया होती, हे दिसून येते. हे सगळ्यांनी आचरणात आणले पाहिजे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
या राज्यात कोणी उपाशी राहू नये, औषध उपचारांविना रुग्णांचे हाल होता कामा नये, शिक्षणापासून कोणी वंचित राहता कामा नये, शेतकऱ्यांनी आत्महत्या करता कामा नये, अशीच सरकारची भावना आहे. हा एकनाथ शरीरात रक्ताचा थेंब असेपर्यंत जनता जनार्दनाची सेवा करत राहील. राजकीय अधिष्ठानापेक्षा धार्मिक आणि आध्यात्मिक अधिष्ठान नेहमीच वरचढ राहिले आहे. वारकऱ्यांना कोणताही त्रास होणार नाही, साधुसंतांच्या केसालाही धक्का लागू देणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.
नव्या पिढीला वारकरी परंपरेशी जोडण्यासाठी कटिबद्ध
वारकऱ्यांसाठी स्वतंत्र मंडळ, वारकऱ्यांच्या दिंड्यांना अनुदान, विमा सुरक्षा, आरोग्य तपासणी असे अनेक निर्णय सरकारने घेतले. मंदिर हेच संस्कारांचे मुख्य केंद्र असल्याने सरकारने ब तीर्थक्षेत्रांचा विकास निधी 2 कोटींवरुन 5 कोटी केला. गोमातेला राज्य मातेचा दर्जा दिला. वारकरी संप्रदायाच्या सेवेसाठी कटिबद्ध होतो, आहे आणि राहीन, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. संताचे विचार समाजात रुजवण्यासाठी आणि नव्या पिढीला या परंपरेशी जोडण्यासाठी आपण सगळ्यांनी कटिबद्ध राहिले पाहिजे, असे ते म्हणाले.