मिळालेल्या माहितीनुसार, सोमनाथ चव्हाण हा गुरुवारी रात्री दुचाकीवरून मद्रे येथील आपल्या घरी परतत होता. मद्रे–आहेरवाडी रस्त्यावरील कोरे वस्ती परिसरात रस्त्याच्या वळणावर दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने त्याचा भीषण अपघात झाला. अपघात इतका तीव्र होता की सोमनाथच्या चेहऱ्यावर गंभीर जखमा होऊन चेहरा पूर्णतः चेंदामेंदा झाला होता. त्यामुळे सुरुवातीला मृत व्यक्तीची ओळख पटवणेही कठीण झाले होते.
advertisement
Railway Update: आता थेट रेल्वेनंच तुळजापूरला जायचं, सोलापूर-धाराशिव मार्गाबाबत मोठं अपडेट
घटनेची माहिती मिळताच मद्रे गावचे पोलीस पाटील अनिल हक्के यांना संशयास्पद मृत्यूबाबत संपर्क करण्यात आला. मृत तरुणाच्या खिशातील मोबाईल फोनला आलेल्या कॉलमुळे अखेर त्याची ओळख सोमनाथ चव्हाण अशी पटली. दरम्यान, वळसंग पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल एस. व्ही. कुवर व त्यांच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.
अपघातानंतर सोमनाथ चव्हाण यांना बेशुद्ध अवस्थेत सोलापूर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी उपचारापूर्वीच सोमनाथ भास्कर चव्हाण यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. या दुर्दैवी घटनेमुळे मद्रे गावात हळहळ व्यक्त होत असून परिसरात शोककळा पसरली आहे. मृत सोमनाथ चव्हाण यांच्या पश्चात आई-वडील, बहीण व भाऊ असा परिवार असून त्यांच्या अकाली निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. वळसंग पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.






