सुरंजन गटांगळ्या खाऊ लागला
मिळालेल्या माहितीनुसार, सुरंजन हा आपल्या बेलेराव आणि माळवदकर या दोन मित्रांसह तलावात पोहण्यासाठी गेला होता. गणपती घाटावरून त्याने पाण्यात उडी मारली आणि त्याचे मित्र मोबाईलवर शूटिंग करत होते. मात्र, पाण्यात उडी मारल्यानंतर अचानक नाका-तोंडात पाणी गेल्यामुळे सुरंजन गटांगळ्या खाऊ लागला. त्याला वाचवण्यासाठी त्याच्या एका मित्राने प्रयत्न केला, पण परिस्थिती हाताबाहेर गेली. सिध्देश्वर तलावात असं काय होतं, ज्यामुळे पोहण्यात तरबेज असणारे दोघंही बुडाले, असा सवाल विचारला जातोय.
advertisement
बेलेरावने वाचवण्यासाठी उडी मारली
सुरंजनला बुडताना पाहून बेलेराव याने त्याला वाचवण्यासाठी तातडीने पाण्यात उडी मारली, परंतु पाण्याचा अंदाज न आल्याने तो स्वतःही बुडू लागला. हे पाहून तिसऱ्या मित्राने आरडाओरडा केला, तेव्हा एका होडी चालकाने प्रसंगावधान राखत बेलेराव याचे प्राण वाचवले. दुर्दैवाने, सुरंजन पाण्याचा मध्यभागी असल्याने तोपर्यंत खोलवर बुडाला होता आणि कोणालाही त्याला वेळेत बाहेर काढता आले नाही. सुरंजन हा आपल्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता आणि तो सोलापुरात डिप्लोमाचे शिक्षण घेत होता. तो आपल्या चुलत मावस भावाकडे राहून आपले भविष्य घडवण्याचे स्वप्न पाहत होता.
अडीच तास शोध मोहीम राबवून पत्ता लागला नाही
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन पथक आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सलग अडीच तास शोध मोहीम राबवूनही सुरंजनचा पत्ता लागला नाही. रात्री अंधार झाल्यामुळे शोधकार्य तात्पुरते थांबवण्यात आले असून, सोमवारी सकाळी पुन्हा शोध मोहीम राबवण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
