शामराव रामाजी देशमुख असं गुन्हा दाखल झालेल्या ५३ वर्षीय शिक्षकाचं नाव आहे. तो कोहमारा येथील रहिवासी असून सडक-अर्जुनी तालुक्यातील ग्राम कोहळी टोला येथील ग्रामविकास पूर्व माध्यमिक सेमी इंग्रजी शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहे. आरोपी शिक्षकाने शाळेतील विविध विद्यार्थिनींशी वारंवार अश्लील चाळे केले आहेत. त्याच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम ६४(२), ६५(२), ७५(२), १८१(१) तसेच बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (पोक्सो) अंतर्गत कलम ४, ६, १२ व बाल न्याय (मुलांची काळजी आणि संरक्षण) अधिनियम ७५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी शिक्षकाने २०२३ ते २०२५ या दोन वर्षांच्या कालावधीत शाळेतील विद्यार्थिनींसोबत अश्लील वर्तन केल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणाची तक्रार चाइल्ड हेल्प लाइन क्रमांक १०९८ वर करण्यात आली होती. त्यानंतर बाल न्याय मंडळ आणि जिल्हा बाल संरक्षण अधिकाऱ्यांनी तपास सुरू केला. चौकशीत आरोपीने मुलींचा छळ केल्याचं स्पष्ट झालं.
हा प्रकार उघडकीस आल्यानंतर डुग्गीपार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली असून त्याला न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. या प्रकरणाच्या तपास डोग्गीपार पोलीस करीत आहे. आरोपी शिक्षक सध्या भंडारा जिल्हा कारागृहात आहे.