ही घटना लातूर शहरातील मेघराजनगर परिसरात घडली. रामेश्वर बाबू बिरादार असं हत्या झालेल्या ३५ वर्षीय शिक्षकाचं नाव असून ते देवणी तालुक्यातील सावरगाव येथील रहिवासी होते. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिक्षक रामेश्वर बिरादार हे शुक्रवारी काही कामासाठी लातूर शहरात आले होते. दुपारच्या वेळी ते मेघराजनगर परिसरातून जात असताना, संशयित आशिव शिंदे याने त्यांना वाटेत अडवले. आशिव शिंदे याने बिरादार यांच्याकडे पैशांची मागणी केली. तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. घाबरलेल्या बिरादार यांनी त्याला तत्काळ १०० रुपये काढून दिले. मात्र, एवढ्यावरच न थांबता संशयित शिंदे याने त्यांच्याजवळील आणखी पैसे आणि मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न केला.
advertisement
यावेळी बिरादार यांनी विरोध केल्याने दोघांमध्ये झटापट सुरू झाली. याच झटापटीदरम्यान, संशयित आशिव शिंदे याने आपल्याजवळ असलेला चाकू काढून रामेश्वर बिरादार यांच्या छातीत क्रूरपणे खुपसला आणि घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न केला. गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या बिरादार यांना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. पोलिसांनी तत्परता दाखवत संशयित आशिव शिंदे याला तातडीने ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.
नुकतीच लागली होती नोकरी
मृत रामेश्वर बिरादार यांची अशाप्रकारे हत्या झाल्यानं हळहळ व्यक्त होत आहे. बिरादार यांना काही महिन्यांपूर्वीच मुख्यमंत्री लाडका भाऊ योजनेअंतर्गत गुरधाळ येथील जिल्हा परिषद शाळेवर सहशिक्षक म्हणून नोकरी मिळाली होती. त्यांची नुकतीच नोकरी लागल्याने कुटुंबात आनंदाचे वातावरण होते. ते अविवाहित होते. त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ आणि बहीण असा परिवार आहे.