आनंदाच्या क्षणीच काळाचा घाला
गेल्या अनेक दिवसांपासून सुनेश जोशी यांना निवडणुकीसाठी उमेदवारी मिळणार की नाही, यावरून जोरदार चर्चा सुरू होत्या. कार्यकर्त्यांमध्ये धाकधूक होती. अखेर रात्री उशिरा पक्षाने त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आणि त्यांना 'एबी फॉर्म' मिळाला. घरात आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण होतं. मंगळवारी सकाळी मोठ्या मिरवणुकीने अर्ज भरण्याची तयारी सुरू होती. मात्र, नियतीने काहीतरी वेगळंच लिहून ठेवलं होतं. अर्ज भरण्याच्या काही वेळ आधीच त्यांचे वडील रामचंद्र जोशी यांचं निधन झालं आणि आनंदावर विरजण पडलं.
advertisement
आधी कर्तव्य मग बाकी
वडिलांच्या निधनामुळे सुनेश जोशी यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला. मात्र, त्याच वेळी त्यांच्यासमोर एक मोठं संकट होतं. उमेदवारी अर्ज भरण्याचा तो शेवटचा दिवस होता. जर त्या दिवशी अर्ज भरला नसता, तर पक्षाने दिलेली जबाबदारी आणि कार्यकर्त्यांचा विश्वास व्यर्थ गेला असता. अशा कठीण प्रसंगात सुनेश जोशी यांनी स्वतःला सावरलं. वडिलांच्या निधनाचं अतीव दुःख मनात दाबून, अश्रूंना वाट मोकळी करून न देता त्यांनी निवडणूक कार्यालय गाठलं.
ठाणेकर सुन्न...
ज्या हातांनी वडिलांना शेवटचा निरोप द्यायचा होता, त्याच हातांनी सुनेश जोशींनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. निवडणूक कार्यालयात अर्ज सादर करताना त्यांच्या चेहऱ्यावरील वेदना स्पष्ट जाणवत होत्या. "वडिलांचे आशीर्वाद आणि जनतेची सेवा हेच माझे कर्तव्य आहे," अशी भावना त्यांच्या कृतीतून दिसत होती. अर्ज भरल्यानंतर त्यांनी तातडीने घरी धाव घेऊन वडिलांच्या अंत्यविधीची तयारी केली.
सुनेश जोशी यांनी दाखवलेल्या या संयम आणि कर्तव्यदक्षतेची चर्चा सध्या संपूर्ण ठाण्यात सुरू आहे. "बापाचं छत्र हरपलेलं असतानाही जनतेच्या सेवेसाठी उभं राहणं, हे खरोखरच काळजावर दगड ठेवण्यासारखं आहे," अशी भावना ठाणेकर व्यक्त करत आहेत.
