नेमकी घटना काय आहे?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी आणि आरोपी मुलगा हे दोघेही अल्पवयीन आहेत. मृत मुलगी आधी चेंबूर येथे राहत होती आणि हल्लेखोर मुलगा चेंबूरचाच रहिवासी आहे. या दोघांचे एकमेकांशी प्रेमसंबंध होते. मात्र काही कारणावरून त्यांच्यात वाद सुरू होता.
घरात घुसून जिवंत जाळलं
चार दिवसांपूर्वी आरोपी मुलगा ठाण्यातील कापूरबावडी येथील मुलीच्या घरी आला. तेव्हा मुलगी घरी एकटीच होती. हे पाहून त्याने तिला गाठले. मिळालेल्या माहितीनुसार, दोघांमध्ये पुन्हा वाद झाला आणि या वादातून संतापलेल्या मुलाने थेट मुलीला पेटवून दिले. या भयानक हल्ल्यात मुलगी ८० टक्के भाजली.
advertisement
घटनेनंतर मुलीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, काल रात्री (दि. २७ ऑक्टोबर) अचानक तिची तब्येत खूपच खालावली. त्यामुळे तिला पुढील उपचारांसाठी मुंबईतील केईएम रुग्णालयात हलवण्यात आले. दुर्दैवाने, आज सकाळी १० वाजून ५० मिनिटांनी डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
जीवे मारण्याची धमकी सत्यात उतरवली
घटनेच्या काही दिवसांपूर्वी, मुलगी भाऊबीज सणासाठी चेंबूर येथे गेली असता, आरोपी मुलाने तिला मारहाण केली होती आणि 'मी तुला जिवंत सोडणार नाही,' अशी धमकीही त्याने सर्वांसमक्ष दिली होती. ही धमकी त्याने आज प्रत्यक्षात आणल्याचे उघड झाले आहे.
ठाणे पोलिसांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेतली असून, आरोपी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे. या घटनेमुळे कापूरबावडी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
