ठाणे : बदलापूरमध्ये नामांकित शाळेत चिमुकल्या मुलींवर झालेल्या अत्याचारानंतर मंगळवारी आंदोलन पेटलं होतं. रेल्वे रुळावर आंदोलक आल्यानं १० तास रेल्वे सेवा ठप्प झाली होती. या प्रकरणी रेल्वे कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला असून २८ जणांना अटक करण्यात आलीय. त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. यावेळी रेल्वेच्या सरकारी वकिलांकडून आंदोलनामुळे १० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा करण्यात आला.
advertisement
बदलापूर रेल्वे ट्रॅकवर आंदोलन केल्या प्रकरणी अटक केलेल्या २८ जणांना कल्याण रेल्वे कोर्टात हजर केले होते. या सर्व आरोपींनी पोलिस कोठडी सुनावण्यात आलीय. आंदोलन पुर्वनियोजीत असल्याचा आरोप वकिलांनी केला. आंदोलनामुळे अनेक लोकल रद्द कराव्या लागल्या. तसंच एक्स्प्रेस गाड्या वळवण्यात आल्या. तब्बल १० तास रेल्वे ट्रॅक बंद होता. यामुळे १० कोटी रुपयांपेक्षा जास्त नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
Badlapur : बदलापूर आंदोलनाबाबत पोलिसांचा धक्कादायक खुलासा, व्हॉइस रेकॉर्डिंग हाती; 68 जणांना अटक
बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणी अती वरीष्ठ अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. वरीष्ठ पोलिस महानिरीक्षक आरती सिंग यांची नेमणूक केलीय. कालच सरकारने या प्रकरणी SIT स्थापन करण्याची घोषणा केली होती. विशेष टीम स्थापन करुन या प्रकरणाचा तपास केला जाणार आहे. आयपीएस आरती सिंग यांनी आज शाळेत जाऊन पाहणी केली आणि माहिती घेतली.
दरम्यान, बदलापूर प्रकरणातील आरोपीचं वकिलपत्र न घेण्याचा निर्णय आहे. कल्याण बदलापूरच्या वकिलांनी अक्षय शिंदेच्या बाजूने लढण्यास नकार दिलाय. वकिलांच्या असोसिएशनने अक्षय शिंदेचं वकीलपत्र न घेण्याचा निर्णय घेतला आहे. तर कल्याण कोर्टातर्फे वकीलांनी आणखी एक आवाहन केलं आहे. रेल्वे एक्ट मध्ये अटक केलेल्यांना सोडून द्यावे. कल्याण कोर्टात हजर केलेल्या आंदोलक आरोपींचे वकील पत्र ते घेणार आहेत. यासाठी कोणतेही मानधन ते घेणार नाहीत.