स्वातंत्र्यपूर्व काळात प्रकाशन विभाग स्थापन
अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ प्रकाशन विभाग प्रमुख गोपाल कडू यांनी लोकल18 शी चर्चा केली. तेव्हा ते सांगतात की, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी श्री गुरुदेव प्रकाशन मंडळची स्थापना सन 1935 साली गुरूकुंज मोझरी येथे केली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं समग्र वांग्मय या प्रकाशन विभागाच्या माध्यमातून प्रकाशित केलं जातं होत. या प्रकाशन विभागाची स्थापना महाराजांनी स्वातंत्र्यपूर्व काळात केली. तेव्हा या विभागाचे नाव धर्मसेवा प्रकाशन विभाग असं होतं. त्यानंतर या विभागाचे नाव श्री गुरुदेव प्रकाशन विभाग असं करण्यात आलं. या प्रकाशन मंडळाची स्थापना करण्यामागचा उद्देश म्हणजे समाजजागृतीसाठी विचारप्रसार करणे. संत साहित्य, भजन, कीर्तन, प्रवचन आणि समाजसुधारणेचे संदेश लोकांपर्यंत पोहोचवणे. तसेच राष्ट्रसंतांच्या ग्रंथांचे आणि सामाजिक वाङ्मयाचे प्रकाशन करणे हा होता.
advertisement
कारागृहात ग्रंथ निर्मिती
स्वातंत्र्यपूर्व काळात देखील महाराजांनी अनेक ग्रंथांची निर्मिती केली. त्यामध्ये सर्वात आधी 1929 साली हिंदी भजनावली प्रकाशित झाली. त्यानंतर 1942 च्या स्वातंत्र्यसंग्रामामध्ये महाराजांनी मोलाचे योगदान दिले. अमरावती जिल्ह्यातील शहीद भूमीमध्ये जाऊन तेथील युवावर्गामध्ये स्वातंत्र्याबद्दल जागरूकता निर्माण केली. अशातच 28 ऑगस्ट 1942 रोजी महाराजांना चंद्रपूर येथून अटक करण्यात आली. त्यानंतर त्यांना रायपूर येथील कारागृहातमध्ये ठेवण्यात आले. त्या कारागृहातील वर्तमानपत्राच्या वरच्या कोऱ्या भागावर महाराजांनी सुविचार लिहिले. त्याच सुविचारतून त्यानंतर काही दिवसांनी सुविचार स्मरणी हा ग्रंथ प्रकाशित झाला.
तसेच ग्रामगीता हा ग्रंथ लेखनाची स्फूर्ती 1953 साली महाराजांना पंढरपूर क्षेत्रामध्ये झाली. त्यानंतर प्रत्यक्ष लेखनाला गुरुकुंज भुमिमध्ये 17 ऑक्टोबर 1954 ला सुरुवात केली. तसेच 25 डिसेंबर 1955 रोजी ग्रामगीता ग्रंथ लिहून पूर्ण झाला. तुमसर येथील विदर्भ साहित्य संघाच्या अधिवेशनामध्ये त्याच प्रकाशन झालं. एकावेळी एक हजार ठिकाणी या ग्रंथाचं प्रकाशन करण्यात आलं. विपुल अशी ग्रंथ संपदा महाराजांनी निर्माण केली, अशी माहिती गोपाल कडू यांनी दिली.