समोर आलेल्या माहितीनुसार, छत्तीसगड येथून ऊस तोडीसाठी आलेले एक कुटुंब माजलगाव तालुक्यात वास्तव्यास होते. या कुटुंबातील दोन अल्पवयीन मुली ऊसतोडीच्या कामासाठी आई-वडिलांसोबत येथे आल्या होत्या. 24 डिसेंबर रोजी या दोन्ही मुली एकट्या असताना गावातील गणेश घाटूळ आणि अशोक पवार या दोघांनी त्यांच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे. घटनेनंतर काही दिवसांनी यातील एका मुलीला त्रास जाणवू लागल्याने तिने घडलेला प्रकार आपल्या कुटुंबीयांना सांगितला.
advertisement
माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव
कुटुंबीयांनी तत्काळ माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. तक्रार दाखल होताच पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी गणेश घाटूळ व अशोक पवार यांना अटक केली आहे. या प्रकरणी भारतीय दंड संहिता तसेच पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
बीडमधील ऊसतोड महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
दरम्यान, पीडित दोन्ही अल्पवयीन मुलींना सुरक्षिततेच्या दृष्टीने महिला व बालकल्याण समितीच्या ताब्यात देण्यात आले असून त्यांचे समुपदेशन आणि वैद्यकीय तपासणी करण्यात येत आहे. या घटनेमुळे ऊसतोड मजूर महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे स्थलांतरित मजुरांसाठी स्वतंत्र सुरक्षा व्यवस्था, निवासस्थानी संरक्षण आणि महिला व बालकांसाठी विशेष दक्षता घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे. या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी सर्व स्तरातून होत असून समाजात तीव्र संतापाची भावना व्यक्त होत आहे.
